IND vs WI 1st ODI Live Updates : शेवटच्या ६ चेंडूंचा थरार! वेस्ट इंडिजने संघर्ष केला, भारताने अवघ्या ३ धावांनी सामना जिंकला

India vs West Indies 1st ODI Live Updates : बांगलादेशकडून ३-० असे पराभूत झालेल्या वेस्ट इंडिज संघाने भारताला टक्कर दिली. रोमारिओ शेफर्डने ( Romario Shepherd) अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 03:19 AM2022-07-23T03:19:05+5:302022-07-23T03:39:54+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st ODI Live Updates : The West Indies gave a tough fight towards the end of their 309 run-chase but fell 3 runs short of victory as India pull of a win in the last over thriller | IND vs WI 1st ODI Live Updates : शेवटच्या ६ चेंडूंचा थरार! वेस्ट इंडिजने संघर्ष केला, भारताने अवघ्या ३ धावांनी सामना जिंकला

IND vs WI 1st ODI Live Updates : शेवटच्या ६ चेंडूंचा थरार! वेस्ट इंडिजने संघर्ष केला, भारताने अवघ्या ३ धावांनी सामना जिंकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st ODI Live Updates : बांगलादेशकडून ३-० असे पराभूत झालेल्या वेस्ट इंडिज संघाने भारताला टक्कर दिली. रोमारिओ शेफर्डने ( Romario Shepherd) अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात विंडीजने चांगला खेळ केला. शिखर धवन ( Shikhar Dhawan), शुबमन गिल ( Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर भारत ४००च्या आसपास धावा करेल असे चित्र दिसत होते, परंतु अखेरच्या १५ षटकांत विंडीज गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. फलंदाजीतही १६ धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर कायले मेयर्स ( Kyle Mayers ) व ब्रुक्सने शतकी भागीदारी करून विंडीजचा पाया मजबूत केला. पण, शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) या दोघांनाही लागोपाठ माघारी पाठवले अन् भारताचे पुनरागमन झाले. त्यानंतर युजवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal) धक्के देत भारताचा विजय पक्का केला. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

३५ षटकांत २ बाद २२५ अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील १५ षटकांत ८३ धावांत ५ फलंदाज गमावले.  शुबमन ( ६४) व  धवन यांची ११९ धावांची भागीदारी १८व्या षटकात संपुष्टात आली. धवन व श्रेयस यांनी ९४ धावा जोडल्या. धवन ९९ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर माघारी परतला. श्रेयस ५७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १३), संजू सॅमसन ( १२) झटपट माघारी परतले. अल्झारी जोसेफने ४९व्या षटकात अक्षर पटेल ( २१) व दीपक हुडा ( २७)  या दोघांचाही त्रिफळा उडवला. भारताला ७ बाद ३०८ धावा करता आल्या. 


वेस्ट इंडिजची सुरुवात काही खास झाली नाही. मोहम्मद सिराजने ५व्या षटकात बाऊन्सरवर शे होपला ( ७) झेल देण्यास भाग पाडले. विंडीजला १६ धावांवर पहिला धक्का बसला. पण, कायले मेयर्स ( Kyle Mayers ) व शामर्ह ब्रूक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. मेयर्सने दमदार अर्धशतक झळकावताना शार्दूल ठाकूरला सॉफ्ट टार्गेट करत चांगली फटकेबाजी केली. अनुभवी गोलंदाजांची उणीव भारताला यावेळी प्रकर्षाने जाणवताना दिसली. शार्दूलची धुलाई होत असूनही कर्णधार धवनने त्याला गोलंदाजीत कायम राखले आणि त्याचा हा निर्णय यशस्वी ठरला. शार्दूलने ११७ धावांची भागीदारी संपुष्टात आणताना ब्रुक्सला ४६ धावांवर बाद केले. विंडीजला १३३ धावांवर दुसरा धक्का बसला. 
   
शार्दूलने पुढच्याच षटकात सेट फलंदाज मेयर्सलाही माघारी पाठवले. मेयर्स ६८ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ७५ धावा करून  माघारी परतला. कर्णधार निकोलस पूरन व ब्रेंडन किंग्स यांनी सुरुवातीला सावध खेळ करून खेळपट्टीवर जम बसवला. पण, आवश्यक नेट रन रेट वाढत जातोय असे दिसताच पुरनने घरच्या मैदानावर जोरदार फटकेबाजी केली. प्रसिद्ध कृष्णाला त्याने लगावलेले दोन षटकार पाहण्यासारखे होते. तरीही त्यांना आवश्यक रन रेट ८च्या आसपास होता. विंडीजला १५ षटकांत विजयासाठी १२० धावा करायच्या होत्या. तेव्हा मोहम्मद सिराजने विंडीजचा कर्णधार पूरनला ( २५) झेलबाद केले. रोव्हमन पॉवेलला ( ६) युजवेंद्र चहलचे बाद केले. 

भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातही उत्तम बचाव करताना विंडीजला एकेका धावेसाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. विंडीजला ६० चेंडूंत ९० धावा करायच्या होत्या. ब्रेंडन किंगने ६० चेंडूंत अर्धशतक झळकावत विंडीजच्या आशा कायम राखल्या होत्या. चहलने टाकलेल्या ४३ व्या षटकात किंगने १३ धावा चोपल्या. किंगने अकिल होसैनसह अर्धशतकी भागीदारी केली.  विंडीजला अखेरच्या ६ षटकांत १०च्या सरासरीने धावा करण्याची गरज होती. चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात किंग ( ५४) माघारी परतला अन् विंडीजसमोरील अडचणी वाढल्या. चहलने ५८ धावांत २ विकेट्स घेतल्या. १२ चेंडू २७ धावा असा सामना अटीतटीचा आला आणि शार्दूल व प्रसिद्ध यांच्यावर सर्व भिस्त होती. 

प्रसिद्धचा पहिलाच चेंडू शेफर्डने उभ्याउभ्या सरळ षटकार खेचला. त्यानंतर प्रसिद्धने पुढील ४ चेंडूंत २ धाव देत चांगले कमबॅक केले. शेफर्डने अखेरचा चेंडू चौकार खेचून ६ चेंडू १५ धावा असा सामना आणला. ५०व्या षटकाचा पहिला चेंडू सिराजने निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या शेफर्डने चौकार खेचला. २ धाव घेत विंडीजने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. सिराजने  Wide टाकला. नंतर २ धाव घेत १ चेंडू ५ धावा असा सामना आणला. पण, सिराजने अखेरच्या चेंडूवर १ धाव देत भारताला ३ धावांनी विजय मिळवून दिला. रोमारिओ शेफर्ड ३७ व होसैन ३२ धावांवर नाबाद राहिले. विंडीजने ६ बाद ३०५ धावा केल्या. 

Web Title: IND vs WI 1st ODI Live Updates : The West Indies gave a tough fight towards the end of their 309 run-chase but fell 3 runs short of victory as India pull of a win in the last over thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.