India vs West Indies 1st ODI Live Updates : बांगलादेशकडून ३-० असे पराभूत झालेल्या वेस्ट इंडिज संघाने भारताला टक्कर दिली. रोमारिओ शेफर्डने ( Romario Shepherd) अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात विंडीजने चांगला खेळ केला. शिखर धवन ( Shikhar Dhawan), शुबमन गिल ( Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर भारत ४००च्या आसपास धावा करेल असे चित्र दिसत होते, परंतु अखेरच्या १५ षटकांत विंडीज गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. फलंदाजीतही १६ धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर कायले मेयर्स ( Kyle Mayers ) व ब्रुक्सने शतकी भागीदारी करून विंडीजचा पाया मजबूत केला. पण, शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) या दोघांनाही लागोपाठ माघारी पाठवले अन् भारताचे पुनरागमन झाले. त्यानंतर युजवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal) धक्के देत भारताचा विजय पक्का केला. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
३५ षटकांत २ बाद २२५ अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील १५ षटकांत ८३ धावांत ५ फलंदाज गमावले. शुबमन ( ६४) व धवन यांची ११९ धावांची भागीदारी १८व्या षटकात संपुष्टात आली. धवन व श्रेयस यांनी ९४ धावा जोडल्या. धवन ९९ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर माघारी परतला. श्रेयस ५७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १३), संजू सॅमसन ( १२) झटपट माघारी परतले. अल्झारी जोसेफने ४९व्या षटकात अक्षर पटेल ( २१) व दीपक हुडा ( २७) या दोघांचाही त्रिफळा उडवला. भारताला ७ बाद ३०८ धावा करता आल्या.
प्रसिद्धचा पहिलाच चेंडू शेफर्डने उभ्याउभ्या सरळ षटकार खेचला. त्यानंतर प्रसिद्धने पुढील ४ चेंडूंत २ धाव देत चांगले कमबॅक केले. शेफर्डने अखेरचा चेंडू चौकार खेचून ६ चेंडू १५ धावा असा सामना आणला. ५०व्या षटकाचा पहिला चेंडू सिराजने निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या शेफर्डने चौकार खेचला. २ धाव घेत विंडीजने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. सिराजने Wide टाकला. नंतर २ धाव घेत १ चेंडू ५ धावा असा सामना आणला. पण, सिराजने अखेरच्या चेंडूवर १ धाव देत भारताला ३ धावांनी विजय मिळवून दिला. रोमारिओ शेफर्ड ३७ व होसैन ३२ धावांवर नाबाद राहिले. विंडीजने ६ बाद ३०५ धावा केल्या.