India vs West Indies, 1st ODI Live Updates : भारतीय संघाने पहिल्या वन डेत दणदणीत विजय मिळवताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) , वॉशिंग्टन सुंदर व प्रसिद्ध कृष्णा यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. पण, या सामन्यात रिषभ पंतची ( Rishabh Pant) विचित्र पद्धतीने विकेट पडली... त्याच्या या विकेटचीच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकात शे होपला ( ८) त्रिफळाचीत केले. ब्रँडन किंग ( १३) व डॅरेन ब्राव्हो ( १८) यांनी विंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात या दोघांनाही बाद केले. त्यानंतर युझवेंद्र चहलने सलग दोन चेंडूंवर निकोलस पूरन ( १८) व कर्णधार किरॉन पोलार्ड ( ० ) यांची विकेट घेतली, पण तो हॅटट्रिक घेण्यापासून चुकला. ७ बाद ७९ अशा अवस्थेत सापडलेल्या विंडीजसाठी जेसन होल्डर व फॅबियन अॅलन ही जोडी धावून आली. या दोघांनी ८व्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी तोडताना फॅबियनला २९ धावांवर बाद केले. होल्डर ७१ चेंडूंत ४ षटकारांसह ५७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकांत १७६ धावांवर तंबूत परतला. चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर सुंदर व कृष्णा यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. रोहितने ५१ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ६० धावा केल्या. त्यानंतर आलेला विराट कोहली ( Virat Kohli) दोन चौकार मारून माघारी परतला. अल्झारी जोसेफने एका षटकात या दोघांनाही बाद केले. इशान किशनला ( २८) अकिला होसैनने बाद केले, तर रिषभ पंत ( ११) दुर्दैवीरित्या बाद झाला. वन डे क्रिकेटमध्ये रिषभ प्रथमच रनआऊट झाला. कशी पडली रिषभची विकेट?सूर्यकुमारने मारलेला सरळ फटका अडवण्यासाठी गोलंदाज जोसेफने पाय लावला आणि चेंडू नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टम्प्सवर आदळला. क्रीज सोडलेल्या रिषभला काहीच करता आले नाही आणि तो धावबाद झाला. पदार्पणवीर दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांनी संयमी खेळ करताना भारताचा विजय पक्का केला. हुडा २६, तर सूर्यकुमार ३४ धावांवर नाबाद राहिला. भारताने २८ षटकांत ४ बाद १७८ धावा करून विजय पक्का केला.