India vs West Indies, 1st ODI Live Updates : विराट कोहलीने ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात आले. BCCIने ही जबाबदारी रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) सोपवली गेली. त्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच वन डे सामन्यात विराट खेळताना दिसतोय. विराट व रोहित यांच्यात नेहमीच वादाच्या चर्चा रंगल्या आणि त्यात लिडर होण्यासाठी कर्णधारपद असायलाच हवे, असे नाही, हे मत विराटने व्यक्त केले. त्यामुळे आजच्या सामन्यातील दोघांच्या केमिस्ट्रीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून सर्वांचे डोळे उघडले असतील.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा यांनी दर्जेदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर ( Jason Holder) आणि फॅबियन अॅलेन यांनी संघर्ष करताना भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले. चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर सुंदर व कृष्णा यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकांत १७६ धावांवर तंबूत परतला.
मोहम्मद सिराजने तिसऱ्याच षटकात शे होपला ( ८) त्रिफळाचीत केले. ब्रँडन किंग ( १३) व डॅरेन ब्राव्हो ( १८) यांनी विंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात या दोघांनाही बाद केले. त्यानंतर युझवेंद्र चहलने सलग दोन चेंडूंवर निकोलस पूरन ( १८) व कर्णधार किरॉन पोलार्ड ( ० ) यांची विकेट घेतली, पण तो हॅटट्रिक घेण्यापासून चुकला. ७ बाद ७९ अशा अवस्थेत सापडलेल्या विंडीजसाठी जेसन होल्डर व फॅबियन अॅलन ही जोडी धावून आली. या दोघांनी ८व्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी तोडताना फॅबियनला २९ धावांवर बाद केले. होल्डर ७१ चेंडूंत ४ षटकारांसह ५७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
या सामन्यात विराट व रोहित एकमेकांशी वारंवार संवाद साधताना दिसले. क्षेत्ररक्षण लावताना एकमेकांचा सल्ला त्यांनी घेतला. इतकेच नव्हे तर किरॉन पोलार्ड जेव्हा बाद झाला तेव्हा विराट व रोहितचं सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते. त्यामुळे या दोघांमध्ये कोणताच वाद नाही हे स्पष्ट होतेय.. या फक्त अफवा होत्या. विराटनेही हे अनेकदा सांगितले आहे.
पाहा व्हिडीओ..