India vs West Indies 1st ODI Live Updates : भारतीय संघ मागील १६ वर्षांत वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे मालिका हरलेला नाही. त्यामुळे आजपासून सुरू होत असलेल्या भारत-वेस्ट इंडिज ( WI vs IND) वन डे मालिकेतही भारताचे पारडे जड आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत युवा खेळाडूंसह मैदानावर उतरणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना वर्क लोडमुळे विश्रांती दिली गेली आहे. वेस्ट इंडिजमध्ये दोन वन डे मालिका जिंकणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय कर्णधार आहे. IND bilateral ODI Series results on WI Soil - १९८३ मध्ये भारतीय संघ प्रथम विंडीजमध्ये द्विदेशीय वन डे मालिका खेळला होता आणि यजमानांनी २-१ अशी ती मालिका जिंकली होती. १९८९ ( ५-०), १९९७ ( ३-१) मध्येही विंडीजने बाजी मारली. २००२मध्ये भारताने २-१ अशा विजयासह विंडीजमध्ये पहिली मालिका जिंकण्याचा पराक्रम केला, परंतु २००६मध्ये त्यांना ४-१ असा पराभव पत्करावा लागला. २००९ पासून भारतीय संघ वन डे मालिकेत विंडीजविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर अपराजित आहे. २००९मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २-१ असा विजय, २०११मध्ये सुरेश रैनाच्या कर्णधारपदाखाली ३-२ असा विजय, २०१७ व २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे ३-१ व २-० असा विजय टीम इंडियाने मिळवला आहे.
आतापर्यंत उभय संघांमध्ये झालेल्या १३६ वन डे सामन्यांत जय-पराजयाची आकडेवारी ही ६७-६३ अशी भारताच्या बाजूने आहे. क्विन्स पार्कवर २०११पासून भारतीय संघ पराभूत झालेला नाही. येथे झालेल्या ८ लढतींत भारताने विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. रवींद्र जडेजा पहिल्या दोन वन डे सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि श्रेयस अय्यरकडे उप कर्णधारपद सोपवले गेले आहे. ( Ravindra Jadeja ruled out of the first two ODIs against West Indies.) शुबमन गिल व शिखर धवन सलामीला येणार आहेत. त्यानंतर श्रेयस, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा असा संघ आहे.