Join us  

IND vs WI 1st ODI: पहिल्या वन डेत भारतीय संघात बदल दिसणार, रिषभ पंतकडे उप कर्णधारपद जाणार; जाणून घ्या कारण

India vs West Indies 1st ODI : भारतीय संघ २०२२ मध्ये भारतात पहिली क्रिकेट मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे यशस्वी पर्व संपल्यानंतर आता टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 5:34 PM

Open in App

India vs West Indies 1st ODI : भारतीय संघ २०२२ मध्ये भारतात पहिली क्रिकेट मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे यशस्वी पर्व संपल्यानंतर आता टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. ६ फेब्रुवारीपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत भारतीय संघात काही बदल पाहायला मिळणार आहे. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे रिषभ पंत ( Rishabh Pant) याच्याकडे उप कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. 

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय खेळाडूंना तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील ३-० अशा दारूण पराभवानंतर भारतीय संघाची घरच्या मैदानावर कामगिरी कशी होते, याची सर्वांना उत्सुकता आहे. रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो आणि शिखर धवन सलामीची जबाबदारी सांभाळू शकतात. अशात ऋतुराज गायकवाड याला पुन्हा एकदा वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत दीपक चहर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, पहिल्या वन डे साठी उप कर्णधार म्हणून रिषभ पंतचं नाव आघाडीवर आहे. या सामन्यात लोकेश राहुल ( KL Rahul) खेळणार नसल्याचे बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केले होते. त्यात जसप्रीतलाही या मालिकेत विश्रांती दिली गेल्यामुळे रिषभ पंतचा पर्यात संघ व्यवस्थापनासमोर आहे. ''हा फक्त एका सामन्यापुरता प्रश्न आहे. लोकेश राहुल दुसऱ्या वन डे साठी संघात परतणार आहे. शिखर धवन आणि रिषभ पंत हे दोन्ही उप कर्णधारपदासाठी दावेदार आहे. पण, रिषभ यष्टिरक्षक आहे आणि DRS किंवा क्षेत्ररक्षणात त्याची फार मदत होऊ शकते. पण, जर संघ व्यवस्थापनाला गरज वाटल्यास, उप कर्णधार निवडला जाईल, अन्यथा पहिल्या वन डेत उप कर्णधार हे पद रिक्तच ठेवलं जाईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport ला सांगितले. विराट कोहली मैदानावर असताना कदाचित उप कर्णधारपद रिक्त ठेवले जाऊ शकते.     रिषभ पंतनं आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषविले आहे आणि भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून रिषभला तयार करण्याचा विचार सुरू आहे. ''भविष्याचा विचार करुन आतापासून तयारी करायला हवी. रिषभ पंत चांगला कर्णधार होईल किंवा तो भारताचा कर्णधार बनेल, असा दावा मी करत नाही. पण, तुम्हाला सर्व प्रभावी पर्यायांचा विचार करायला हवा. सध्याच्या घडीला लोकेश राहुल व रिषभ हे दोन सक्षम पर्याय समोर आहेत,''असेही अधिकाऱ्यानं सांगितले. 

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरिषभ पंतलोकेश राहुल
Open in App