Suryakumar Yadav, IND vs WI, 1st ODI : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात सांघिक कामगिरी करताना वेस्ट इंडिजव ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या फिरकीनंतर रोहित शर्माच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. सूर्यकुमार यादव व पदार्पणवीर दीपक हुडा यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमार ( Suryakumar Yadav) ने या सामन्यात नाबाद ३४ धावांची खेळी करताना पाचव्या विकेटसाठी दीपक हुडासह ६२ धावांची भागीदारी केली.
सूर्यकुमारने ३६ चेंडूंत ३४ धावा केल्या आणि त्यात ५ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या ३४ धावांनी मोठा विक्रम नोंदवला आहे आणि असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. शिवाय त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यालाही धक्का दिला. चहलच्या चार आणि वॉशिंग्टनच्या तीन विकेट्सच्या जोरावर भारताने विंडीजचा संघ १७७ धावांवर माघारी पाठवला. त्यानंतर रोहित शर्माचे अर्धशतक, सूर्यकुमार यादव व दीपक हुडाच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने १३२ चेंडू राखून हा सामना जिंकला.
भारताचा पहिला व जगातील पाचवा फलंदाज ठरला सूर्यकुमार
सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील पहिल्या पाच डावांमध्ये ३०+ धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने आतापर्तंत पाच डावांत ३१*, ५३, ४०, ३९ व ३४* अशी कामगिरी केली आहे. वन डे क्रिकेट इतिहासात पहिल्या पाच डावांमध्ये ३०+ धावा करणारा तो भारताचा पहिला व जगातील पाचवा फलंदाज बनला आहे. याआधी इंग्लंडचा जो रूट, पाकिस्तानचा फाखर जमान, नेदरलँड्सचा रियान डॅस कँटे व ऑस्ट्रेलियाच्या टॉम कूपर यांनी असा पराक्रम केला आहे. सूर्यकुमारने यासह माजी सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धूचा विक्रम मोडला. सिद्धूने सलग ४ डावांमध्ये ३०+ धावा केल्या होत्या.
Web Title: IND vs WI, 1st ODI : Suryakumar Yadav became the first Indian to score five 30+ scores in first five ODI innings, break Navjot Sidhu record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.