IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्या वन डे सामन्यात भारताकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडिजला अवघ्या २८ षटकांत गुंडाळलं आणि केवळ १७८ धावाच करू दिल्या. जेसन होल्डरने एकमेव अर्धशतक झळकावलं. हे आव्हान भारताने सहज पार केलं. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड हा फटकेबाजीसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे पोलार्डचा बिमोड कसा करायचा, याचा प्लॅन आधीच तयार होता. त्यानुसार पोलार्डला पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवण्यात आलं.
युजवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना कायरन पोलार्ड खेळायला आला. पोलार्ड मैदानात येताच विराट कोहलीने चहलला सांगितलं, "उल्टा वाला डाल". स्टंप माईकमध्ये त्याचं वाक्य स्पष्टपणे ऐकू आलं. त्यानंतर लेग स्पिनर युजवेंद्र चहलने 'दुसरा' टाकत ऑफ स्पिन होणारा चेंडू टाकला. त्या चेंडूमुळे पोलार्ड पूर्णपणे गोंधळला आणि पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पोलार्ड झटपट बाद करण्यासाठी विराट आणि चहल यांनी जो प्लॅन केला होता, तो लगेच यशस्वी झाला. पाहा तो व्हिडीओ-
सामना संपल्यानंतर कायरन पोलार्डने आपली चूक मान्य केली. पुढच्या सामन्यांआधी आम्हाला थोडा खोलात जाऊन सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल आणि माझ्यासकट सगळ्यांना तांत्रिकदृष्ट्या थोडा खेळ सुधारावा लागेल, असं पोलार्ड म्हणाला. खालच्या फळीत जेसन होल्डर आणि फॅबियन अँलन दोघांनी चांगली फलंदाजी केली. अल्झारी जोसेफ आणि अकील होसेन यांनी गोलंदाजीत चांगली धार दाखवली. या दोन गोष्टी सकारात्मक आहेत आणि त्यासाठी मी आनंदी आहे, असं पोलार्ड म्हणाला.
५० पैकी २२ षटके आम्ही वाया घालवली, हे लज्जास्पद आहे. वन डे सामन्यात आमच्या फलंदाजांना ५० षटकेही पूर्ण फलंदाजी करता आली नाही ही शरमेनं मानी खाली जाणारी गोष्ट आहे. या गोष्टीवर आम्ही नक्कीच विचार करू आणि पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करू असंही पोलार्ड म्हणाला.