कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमानांनी विजय मिळवला. मात्र, 110 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला घाम गाळावा लागला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी केली. दिनेश कार्तिकने उपयुक्त खेळी करताना भारताला 5 विकेट राखून विजय मिळवून दिला.
रोहित शर्माचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि वेस्ट इंडिज संघाला 109 धावांपर्यंतच मजल मारू दिली. कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांनीही टिच्चून मारा केला. विंडीजला 20 षटकांत 8 बाद 109 धावा करता आल्या. ट्वेंटी-20 संघात पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्या व खलील अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात हवी तशी झाली नाही. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे लक्ष्य सहज पार करतील असे वाटत असताना ओशाने थॉमसने भारतीय फलंदाजीचा कणाच मोडला. थॉमसने भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. रिषभ पंतही लगेच माघारी परतल्याने भारताच्या अडचणी वाढल्या होत्या. लोकेश राहुल खेळपट्टीवर स्थिर होऊ पाहत होता, परंतु कार्लोस ब्रेथवेटने त्याला चतुराईने बाद केले. दिनेश कार्तिक व मनिष पांडे या जोडीने संयमी खेळ करताना भारताला विजयासमीप आणले. पण पांडेने विकेट सहज फेकली आणि त्यानंतर कृणाल पांड्याने कार्तिकला साजेशी साथ देत भारताचा विजय पक्का केला.