कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. पण त्यांना आपली चमक दाखवता आलेली नाही. कसोटी आणि एकदिवसीय मालिका त्यांनी गमावलेली आहे. पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला. ख्रिस गेल, सुनील नरिन आणि आंद्रे रसेलसारखे नावाजलेले खेळाडू लीगमध्ये खेळताना दिसतात, पण त्यांना वेस्ट इंडिजकडून खेळायचंच नाही, असं वेस्ट इंडिजच्या एका माजी खेळाडूने म्हटले आहे.
वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळ खेळाडूंना योग्य मानधन देत नसल्याचे म्हटले जाते. काही स्टार खेळाडू आणि मंडळाचे काही वर्षांपूर्वी मोठे भांडण झाले होते. त्यानंतर काही खेळाडूंना मंडळाने बाहेरचा रस्ता दाखवला होता.
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू कार्ल हूपर म्हणाला की, " स्टार खेळाडूंना वेस्ट इंडिजसाठी खेळायचंच नाही. कारण खेळाडू आणि क्रिकेट मंडळामध्ये वाद आहेत. या वादात न पडता खेळाडूंना लीगमधून जास्त पैसा मिळतो त्यामुळेच त्यांना देशाकडून खेळायचे नाही. "