IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिज संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतावर ४ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ब्रेंडन किंग ( २८) , निकोलस पूरन ( ४१), रोव्हमन पॉवेल ( ४८) यांनी चांगली फटकेबाजी केली. चहल व अर्शदीप यांनी प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादव व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. विंडीजला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. तिलक वर्मा (३९), सूर्यकुमार यादव ( २१) आणि हार्दिक पांड्या ( १९) यांनी चांगला खेळ केला. संजू सॅमसन ( १२) रन आऊट झाला अन् सामना फिरला. अक्षर पटेल ( १३) व अर्शदीप सिंग ( १२) यांना पराभव टाळता आला नाही. भारताला ९ बाद १४५ धावा करता आल्या.
या सामन्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. षटकांची वेळ मर्यादा न पाळल्याने दोन्ही संघांना ICC ने दंड सुनावला आहे. भारतीय खेळाडूंना त्यांच्या मॅच फी मधील ५ टक्के, तर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना १० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार दंड आकारण्यात आला, जो किमान ओव्हर-रेटशी संबंधित आहे. कायद्यानुसार, खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या संघाने दिलेल्या वेळेत गोलंदाजी न केल्यास त्यांच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड आकारला जातो. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या या दोघांनीही गुन्हा कबूल केला. मैदानावरील पंच ग्रेगरी ब्रॅथवेट आणि पॅट्रिक गस्टार्ड यांच्यासह तिसरे पंच निगेल ड्युगाइड आणि चौथे पंच लेस्ली रेफर यांनी हे आरोप लावले.