Join us  

नंबर १ भारत हरला! युझवेंद्र चहलने मोठा घोळ घातला, कुणाला न सांगता बॅटींगला आला अन्...

India vs West Indies 1st T20I Live Marathi : भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने ४ धावांनी पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 12:08 AM

Open in App

India vs West Indies 1st T20I Live Marathi : भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने ४ धावांनी पराभूत केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चौथ्यांदा भारताला १५० धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव वगळल्यास भारताच्या फलंदाजांनी निराश केले. जेसन होल्डरच्या एका षटकात संपूर्ण सामना फिरला. त्याने आधी हार्दिक पांड्याचा त्रिफळा उडवला अन् नंतर संजू सॅमसन रन आऊट झाला. पण, खरा गोंधळ हा युझवेंद्र चहलने २०व्या षटकात घातला. तो मैदानावर तळ्यात-मळ्यात खेळताना दिसला.  

लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिल ( ३) आणि इशान किशन ( ६) हे झटपट माघारी परतले. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ३९ धावांची भागीदारी करताना डाव सावरला होता, परंतु जेसन होल्डरने ही जोडी तोडली. सूर्यकुमार ( २१) बाद झाल्यानंतर १० धावांच्या अंतराने तिलक ( ३९ ) माघारी परतला. हार्दिक व संजू सॅमसन हे फॉर्मात असलेल्या फलंदाजांवर भीस्त होती. होल्डरने १६व्या षटकात हार्दिकचा ( १९) त्रिफळा उडवला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात संजू १२ धावांवर रन आऊट झाला. अक्षर पटेलही १३ धावांवर बाद झाला. अर्शदीप सिंगने सलग २ चौकार खेचून मॅचमध्ये रोमांच आणला. ६ चेंडूंत १० धावा हव्या असताना कुलदीप त्रिफळाचीत झाला.

२०व्या षटकात गोंधळ झाला... ५ चेंडूंत १० धावांची गरज असताना युझवेंद्र चहल मैदानावर आला, परंतु संघ व्यवस्थापनाने त्याला माघारी बोलावले. मुकेश कुमार फलंदाजीसाठी सीमारेषेवर आलाच होता. चहलही मैदानावर येऊन पुन्हा बाहेर गेला, परंतु यावेळी अम्पायरने त्यालाच खेळायला सांगितले. संघ व्यवस्थापनाला या परिस्थितीत खरं तर मुकेशला पाठवायचे होते. पण, चहल स्वतः फलंदाजीला आला. चहलने १ धाव काढून अर्शदीपला स्ट्राईक दिली आणि त्याने २ धावा काढत ३ चेंडू ७ धावा अशी मॅच आणली. पुढील चेंडू निर्धाव पडला अन् पाचव्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात अर्शदीप १२ ( ७ चेंडू) धावांवर रन आऊट झाला. भारताला ९ बाद १४५ धावा करता आल्या. विंडीजने ४ धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी, ब्रेंडन किंगने ( २८) विंडीजला चांगली सुरुवात करून दिली, परंतु युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले. निकोलस पूरनने ३४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या.  रोव्हमन पॉवेलने   ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४८ धावा केल्या. मुकेश कुमार व अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांत टिच्चून मारा करताना विंडीजच्या धावगतीला वेसण घातले. चहल व अर्शदीप यांनी प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादव व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. विंडीजला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयुजवेंद्र चहल
Open in App