India vs West Indies, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईचे ( Ravi Bishnoi) झोकात पदार्पण अन् रोहित शर्माच्या १९ चेंडूंतील ४० धावांची आतषबाजीनं ईडन गार्डन जिंकले. वेस्ट इंडिजने ठेवलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित व इशान किशन यांनी दमदार सुरूवात करून दिली. रोहितनंतर पटापट विकेट पडल्या अन् विंडीजचा संघ सामन्यात पुनरागमन करेल असे चित्र दिसू लागले. मात्र, सूर्यकुमार यादवने सुरुवातीला सावध खेळ करून स्वतःला खेळपट्टीवर स्थिरावले आणि त्यानंतर फटकेबाजी करून भारताला विजय मिळवून दिला.
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात ब्रेंडन किंग्सला बाद केले. ७व्या षटकात युझवेंद्र चहलने कायल मेयर्सला ३१ धावांवर LBW केले. पदार्पणवीर रवी बिश्नोईने ११व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. त्या षटकात त्याने रोस्टन चेस ( ४) व रोवमन पॉवेल ( २) यांची विकेट घेतली. निकोलस पूरन एक बाजून लावून खेळत होता आणि ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावा केल्या. वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. बिश्नोईने ४ षटकांत १७ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. किरॉन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला. हर्षल पटेलनेही ३७ धावांत २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात रोहित व इशान यांनी तुफान सुरूवात केली. ओडीन स्मिथच्या पहिल्याच षटकात रोहितने २२ धावा चोपल्या. त्यात दोन चौकार व दोन षटकार खेचले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकांत ६४ धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसने ८व्या षटकात रोहितला बाद केले. रोहितने १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा केल्या. विराट कोहली व इशान या दोघांनाही जीवदान मिळालं होतं. पण, हे जीवदान फार काळासाठी भारताच्या पथ्यावर पडले नाही. १२व्या षटकात रोस्टन चेसने २७ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. इशान ४२ चेंडूंत ३५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डने फॅबियन अॅलेनला गोलंदाजीसाठी आणले आणि त्याने विराटची ( १७) विकेट घेतली. चार चेंडूंच्या फरकाने भारताला दोन धक्के बसले. उप कर्णधार रिषभ पंतही ( ८) लगेच माघारी परतला. रोस्टन चेसने १४ धावांत २ विकेट्स घेतल्या.
विजयासाठी ३० चेंडूंत ३८ धावांची गरज असताना सूर्यकुमार यादव व वेंकटेश अय्यर ही नवी जोडी मैदानावर होती. स्थिरावल्यानंतर सूर्यकुमारने फटकेबाजी सुरू केली. वेंकटेशनेही त्याला सुरेख साथ दिली आणि भारताने पहिली ट्वेंटी-२० जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. सूर्यकुमारने १८ चेंडूंत ३५ धावा चोपल्या, तर वेंकटेशही २४ धावांवर नाबाद राहिला.