India vs West Indies, 1st T20I Live Updates : कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) ने ईडन गार्डनवर पाऊल ठेवताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेसाठी कोलकाता येथे दाखल झाला. रोहित आणि ईडन गार्डन यांचे खास नाते आहे.. रोहितने या ऐतिहासिक मैदानावर अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत आणि आज मैदानावर पाऊल ठेवताच त्याने विक्रमाला गवसणी घातली. हिटमॅन रोहितने यावेळी पाकिस्तानचा दिग्गज मोहम्मद हाफिज याचा विक्रम मोडला.
आजच्या सामन्यात रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi ) पदार्पण केले. २०२०च्या १९ वर्षांखालील संघातून थेट टीम इंडियाच्या सीनियर संघात पदार्पण करणारा पहिलाच खेळाडू ठरला. युझवेंद्र चहलने त्याला पदार्पणाची कॅप दिली. वेस्ट इंडिजच्या संघात कर्णधार किरॉन पोलार्डचे पुनरागमन झाले, परंतु अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर याला दुखापतीमुळे मुकावे लागले. वन डे मालिकेतील दोन सामन्यांत तो खेळला नव्हता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ आजच्या सामन्यात पाच फलंदाज, एक अष्टपैलू आणि दोन फिरकीपटूंसह तीन जलदगती गोलंदाज असा संघ रोहितने मैदानावर उतरवला आहे.
सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने खेळणारा खेळाडू रोहितचा हा १२० वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना आहे आणि सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूमध्ये त्याने मोहम्मद हाफिजला ( ११९) मागे टाकले. या विक्रमात पाकिस्तानचा शोएब मलिक १२४ सामन्यांसह आघाडीवर आहे.