India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात प्रभावी कामगिरी केली. त्याला अन्य गोलंदाजांची आणखी चांगली साथ मिळाली असती तर टीम इंडियाला या सामन्यात वेस्ट इंडिजच्या धावसंख्येवर अंकुश लावता आला असता. विंडिजचा निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) याने एक बाजूने खिंड लढवताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पाचव्या जलद अर्धशतकाची नोंद केली. पूरनच्या संघर्षामुळे विंडिजला यजमानांसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आल्या. रवी बिश्नोईने आज सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar) १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रेंडन किंग्सने खणखणीत चौकार मारला, परंतु भुवीने कमबॅक करताना पाचव्या चेंडूवर त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरन याने सलामीवीर कायल मेयर्ससोबत संयमी खेळ केला. दीपक चहरने टाकलेल्या चौथ्या षटकात दोन्ही फलंदाजांचे झेल उडाले, परंतु भारतीय खेळाडूंना थोडक्यात ते झेल टिपता आले नाही. याच षटकात पूरनने वाईड मिड ऑनला लगावलेला षटकात पाहण्यासारखा होता. ७व्या षटकात रोहितनं फिरकीपटू युझवेंद्र चहलला आणले आणि त्याने विकेट घेतली. त्याआधी रवी बिश्नोईने निकोलस पूरनचा झेल टिपला होता, परंतु अंदाज चुकल्यानं तो सीमारेषेवर जाऊन टेकला. पण, याची भरपाई चहलने कायल मेयर्सला बाद करून घेतली. मेयर्स ४२ धावांवर LBW झाला.
पदार्पणवीर रवी बिश्नोईने ११व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने रोस्टन चेसला ( ४) पायचीत केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोवमन पॉवेल ( २) उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद झाला. निकोलस पूरन एक बाजून लावून खेळत होता आणि त्याने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण,त्याला हर्षल पटेलने चतुराईने बाद केले. संथ गतीने चेंडू टाकून पटेलने पूरनला झेलबाद केले. पूरन ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. किरॉन पोलार्ड २४ धावांवर नाबाद राहिला.