India vs West Indies, 1st T20I Live Updates : वन डे मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आता ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे आणि त्याचा पहिला सामना आज होणार आहे. लोकेश राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ही मालिका सुरू होण्याआधीच माघार घेतली आणि त्यामुळे काही नवीन चेहरे संघात दाखल झाले आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत या मालिकेत काही नवीन प्रयोग करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते याची उत्सुकता लागली आहे. रोहित शर्मा हा सलामीला उतरणार हे निश्चित आहे, परंतु त्याच्या जोडीला इशान किशन दिसेल की ऋतुराज गायकवाड?, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ऋतुराजला वन डे मालिकेत खेळता आले नाही, परंतु ट्वेंटी-२० मालिकेत इशानच्या आधी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनचा विचार केला, तर इशान व रोहित ही जोडी मैदानावर दिसू शकते.
मधल्या फळीत विराट कोहली व सूर्यकुमार यादव हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. श्रेयस अय्यर संघात आहे, परंतु त्याचा ट्वेंटी-२० साठी विचार होणे अवघड आहे. रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळणार आहे. अष्टपैलूच्या शर्यतीत दीपक चहर व शार्दूल ठाकूर यांच्यावर संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे. त्यात वेंकटेश अय्यरलाही अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळेल का, याचे उत्तर प्रत्य सामना पाहतानाच मिळेल. जलदगती गोलंदाजी विभागात हर्षल पटेल व मोहम्मद सिराज हे पर्याय आहेत, तर युझवेंद्र चहल हा फिरकीपटूची एक जागा भरेल.
टीम इंडियाचा संभाव्य संघ - इशान किशन/ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/ श्रेयस अय्यर, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.