yashasvi jaiswal father kavad yatra : यशस्वी जैस्वालने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सध्या वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली असून यजमान संघावर पराभवाचे सावट आहे. या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने दिग्गज सुनिल गावस्कर यांसारख्या महान फलंदाजांचा विक्रम मोडित काढला. तो एकमेव सलामीवीर ठरला आहे, ज्याने पदार्पणाच्या सामन्यात विदेशी जमिनीवर शतक झळकावले आहे.
यशस्वी जैस्वालच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्या मुलाचे द्विशतक व्हावे अशी इच्छा असल्याचे म्हणत आहेत. कावड यात्रेला निघालेल्या यशस्वीच्या वडिलांनी सांगितले की, कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण भदोरी जिल्ह्यात जल्लोष सुरू आहे. "माझ्या मुलाने द्विशतक झळकावे आणि उत्तर प्रदेशचे नाव मोठे करावी अशी माझी इच्छा आहे. त्याचे द्विशतक पूर्ण व्हावे, यासाठी मी बाबांच्या धाममध्ये यासाठी प्रार्थना करणार आहे. त्याच्या मेहनतीला यश मिळो", असेही त्यांनी सांगितले. यशस्वी जैस्वाल १४३ धावांची विक्रमी खेळी करून खेळपट्टीवर टिकून आहे. सामन्यानंतर बोलताना शतकवीर भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वी (१४३*) तंबूत परतला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वी जैस्वालने म्हटले, "हा क्षण खरोखरच खूप भावनिक आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि त्या सर्वांसाठी ज्यांनी मला प्रत्येक पावलावर साथ दिली आहे, कारण माझा इथपर्यंतचा प्रवास मोठा आहे. मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी मला मदत केली. मी ही शतकी खेळी माझ्या आई-वडिलांना समर्पित करू इच्छितो. माझ्या आयुष्यात त्यांचे खूप योगदान आहे. ते देव आहेत... ही फक्त सुरुवात आहे. अजून पुढे खूप काही करायचे आहे."
भारत मजबूत स्थितीतसध्या सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॅरेबियन संघ पहिल्या डावात १५० धावांत गुंडाळला गेला. यजमान संघाला प्रत्युत्तर देताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (१०३) आणि यशस्वी जैस्वाल (१४३*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर २ गडी गमावून भारतीय संघाने ३१२ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे दुसऱ्या दिवसाअखेर १६२ धावांची आघाडी आहे.