IND vs WI 1st Test : यशस्वी जैस्वालचे अविस्मरणीय पदार्पण.. आर अश्विनच्या १२ विकेट्स अन् रोहित शर्मा व विराट कोहली यांना गवसलेला सूर.. यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी गाजली.. यशस्वीसह या सामन्यातून इशान किशन याने कसोटी संघात पदार्पण केले. पण, इशानला फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु त्याने यष्टिंमागे चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माचा ओरडाही त्याने ऐकला. त्याचवेळी त्याने चिटींग करण्याचाही प्रयत्न केला, सुदैवाने तो फसला अन् मोठा वाद होता होता राहिला...
विंडीजच्या पहिल्या डावातील १५० धावांच्या प्रत्युत्तरात ४२१ धावा करून भारताने २७१ धावांची आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल ( १७१), रोहित शर्मा ( १०३) आणि विराट कोहली ( ७६) यांनी दमदार फलंदाजी केली. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनने दुसऱ्या डावात ७१ धावांत ७ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १३० धावांवर कोसळला अन् भारताने एक डाव व १४१ धावांनी सामना जिंकला. WTC 2023-25 हंगामातील पहिलीच कसोटी जिंकून भारताने १०० टक्क्यांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया Ashes मालिकेत २-१ असे आघाडीवर असले तरी त्यांची सरासरी ही ६१.११ अशी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडची सरासरी २७.७८ अशी आहे. भारताने WTC Standing मध्ये ऑसींना दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.
इशान किशनने असं काय केलं?जेसन होल्डर भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना करत होता. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू यष्टिरक्षक इशानच्या हाती विसावला. होल्डर क्रिज कधी सोडतोय याची वाट इशान पाहत होता आणि त्याने पाय उचलताच त्याने यष्टी उडवल्या अन् अपील केले. Ashes मालिकेत इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अॅलेक्स केरीने असेच बाद केले होते आणि त्यामुळे मोठा वाद झाला होता. इशानच्या बाबतीत अम्पायरने षटक संपल्याचे आधी जाहीर केल्याने त्याची अपील ग्राह्य धरली गेली नाही आणि त्यामुळे वादाला निमित्त मिळालं नाही. मात्र, इशानच्या या कृतीने क्रिकेट चाहते नाराज झाले.