India vs West Indies 1st Test Live : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्लेइंग इलेव्हनबाहेर बसवलेल्या आर अश्विनने आज वेस्ट इंडिजविरुद्ध कमाल करून दाखवली. भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमानांचा पहिला डाव १५० धावांवर गुंडाळला. अश्विनने ( R Ashwin) ५ विकेट्स घेत विक्रमांची रांग लावली, रवींद्र जडेजाने ३ तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला मागील काही काळापासून चांगली कामगिरी करता आली नाही. आजही तो लवकर बाद झालाच असता, परंतु अम्पायरमुळे तो वाचला. (IND vs WI 1st Test Live Scoreboard )
पदार्पणवीर एलिक अथानाझे ( ४७) वगळल्यास वेस्ट इंडिजचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( २०) आणि तागेनारायण चंद्रपॉल ( १२ ) यांना आर अश्विनने माघारी पाठवले. शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात रेयमंड रेइफर ( २) ची विकेट मिळवली आणि जडेजाने जेरमेन ब्लॅकवूड ( १४) आणि जोशुआ डा सिल्वा ( २) यांना बाद करून विंडीजचा निम्मा संघ ७६ धावांत तंबूत पाठवला. जेसन होल्डर व पदार्पणवीर एलिक अथानाझे यांनी सहाव्या विकेटसाठी १०८ चेंडूंत ४१ धावा जोडल्या. मोहम्मद सिराजने होल्डरला चूक करण्यास भाग पाडले. तो ६१ चेंडूंत १८ धावा करून बाद झाला. अथानाझेचे अर्धशतक ( ४७) थोडक्यात हुकले. विंडीजचा संघ १५० धावांत तंबूत परतला. अश्विनने २४.३-६-६०-५ अशी स्पेल टाकली.
यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही नवी जोडी सलामीला आली अन् दुसऱ्याच षटकात रोहितसाठी LBW ची जोरदार अपील झाली. विंडीजने DRS घेतला, परंतु अम्पायर्स कॉल असल्याने रोहित वाचला. ९व्या षटकात अल्झारी जोसेफचा वेगवान चेंडू रोहितच्या बॅटला लागून पायावर जोरदार आदळला अन् स्टम्पवर जाता जाता वाचला. पण, रोहितला वेदनेने त्रासलेला दिसला.
१९६२ नंतर वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत सलामीला आलेला रोहित हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. तेव्हा नरी काँट्रॅक्टर सलामीला आले होते.