India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यानंतर युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने विंडीजला बॅकफूटवर फेकले. यशस्वीने पदार्पणात अर्धशतक झळकावून तीन मोठे विक्रम नोंदवले अन् रोहितसह भारतासाठी १७ वर्षांनंतर मोठा विक्रम नोंदवला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारताच्या नावावर राहिला. कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( २०) आणि तागेनारायण चंद्रपॉल ( १२ ) यांना आर अश्विनने माघारी पाठवले. शार्दूल ठाकूरने रेयमंड रेइफर ( २) ची विकेट मिळवली आणि जडेजाने जेरमेन ब्लॅकवूड ( १४) आणि जोशुआ डा सिल्वा ( २) यांना बाद करून विंडीजचा निम्मा संघ ७६ धावांत तंबूत पाठवला. जेसन होल्डर ( १८) व पदार्पणवीर एलिक अथानाझे ( ४७) यांनी सहाव्या विकेटसाठी १०८ चेंडूंत ४१ धावा जोडल्या. विंडीजचा संघ १५० धावांत तंबूत परतला. अश्विनने २४.३-६-६०-५ अशी स्पेल टाकली. रवींद्र जडेजाने ३ तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.
यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा या नव्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली आणि दिवसअखेर बिनबाद ८० धावा जोडल्या होत्या. या दोघांना बाद करण्यासाठी विंडीजने फिरकीपटूंला लगेच बोलावले, अनुभवी जेसन होल्डरलाही गोलंदाजीला आणले, परंतु ही जोडी तोडू शकले नाही. केमार रोचच्या दुसऱ्या षटकात रोहितसाठी LBW ची अपील झाली होती, मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यावर DRS घेतला गेला अन् तिथेही अम्पायर्स कॉल दिल्याने रोहित बचावला. यशस्वीने पदार्पणात अर्धशतक पूर्ण केले. त्याने १०४ चेंडूंत ७ चौकारांच्या सहाय्याने ही खेळी केली अन् रोहितसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला.
रोहित शर्मा आणि यशस्वी ही ओपनिंग जोडी वेस्ट इंडिजविरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये १७ वर्षानंतर शतकी भागीदारी करणारी पहिली भारतीय जोडी ठरली. यापूर्वी २००६ मध्ये वसीम जाफर व वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला होता.
पदार्पणात ५०+ धावा करणारा यशस्वी हा तिसरा युवा भारतीय फलंदाज ठरला. अब्बास बेग यांनी १९५९ मध्ये इंग्लंडविरुद्ध २० वर्ष व १२६ दिवसांचा असताना आणि वॉशिंग्टन सुदंरने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ वर्ष व १०२ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. यशस्वी २१ वर्ष व १९६ दिवसांचा आहे.