India vs West Indies 1st Test Live : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये आर अश्विनला ( R Ashwin) न खेळवण्यावरून चांगलाच वाद रंगला होता. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लाएनने एकीकडे धडाधड विकेट्स घेतल्या होत्या, तिथे अश्विन असता तर भारताला फायला नक्कीच झाला असता. आज अश्विनने त्याच्या कामगिरीतून पुन्हा एकदा तो निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून दिले. जलदगती गोलंदाज फार कमाल करत नसताना ९व्या षटकात अश्विनला गोलंदाजीला आणले अन् त्याने त्याच्या पाच षटकांत विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. पण, यातली पहिली विकेट ऐतिहासिक ठरली.
बाप-बेटा! सचिन तेंडुलकरच्याच नावावर होता विक्रम; आज विराट कोहलीने केला पराक्रम
भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांनी आज कसोटीत पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणारा इशान हा तिसरा भारतीय यष्टिरक्षक ठरला. यापूर्वी १९७१ मध्ये पोचिह कृष्णमुर्थी ( किंगस्टन) आणि २००२ मध्ये अजय रात्रा ( पोर्ट ऑफ स्पेन) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. भारताकडून कसोटीत एकाच सामन्यात डावखुरे खेळाडू पदार्पण करण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी २०२१ मध्ये टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते.
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि तागेनारायण चंद्रपॉल यांनी चांगला खेळ करताना १२ षटकं खेळून काढली. जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज यांना खेळपट्टीची फार मदत मिळत नव्हती. म्हणून रोहितने फिरकीपटू आर अश्विनला गोलंदाजीला आणले अन् त्याने त्याच्या तिसऱ्या षटकात यश मिळवून दिले. चंद्रपॉलला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत करून १२ धावांवर माघारी पाठवले. विंडीजला ३१ धावांवर पहिला धक्का बसला. २०११ मध्ये अश्विनने शिवनारायण चंद्रपॉलची विकेट घेतली होती आणि आज त्याच्या मुलालाही त्याने बाद केले. बाप-मुलाला बाद करणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला. (IND vs WI 1st Test Live Scoreboard )
अश्विनच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात ब्रेथवेट २० धावांवर रोहितच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विंडीजचे दोन्ही सलामीवीर ३८ धावांवर बाद झाले. वडील आणि मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद करणारा अश्विन चौथा गोलंदाज ठरला. यापूर्वी इयान बॉथम ( लान्स व ख्रिस क्रेन्स), वसमी अक्रम ( लान्स व ख्रिस क्रेन्स) आणि मिचेल स्टार्क ( शिवनारायण व तागेनारायण चंद्रपॉल) यांनी असा पराक्रम केला होता.