IND vs WI 1st Test Live updates Marathi : भारतीय संघाने WTC 2023-25 हंगामातील पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले. विंडीजच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी २२९ धावांची भागीदारी करून विक्रमांचे इमले रचले. शतकानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित झेलबाद झाला अन् तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुबमन गिलही लगेच बाद झाला. १३३ धावांवर केमार रोचच्या गोलंदाजीवर यशस्वी LBW होता, परंतु विंडीजने सर्व DRS गमावल्यामुळे मैदानावरील पंचाच्या निर्णयाला ते आव्हान देऊ शकले नाही. विंडीजने आज ९ गोलंदाज वापरून पाहिले, परंतु यशस्वीला ते रोखू नाही शकले.
दबक्या पावलांनी आला अन्...! यशस्वी जैस्वालने रोहितसह मोडले ९ मोठे विक्रम, १९३६नंतर घडला पराक्रम
यशस्वी व रोहित या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी करताना विंडीजला बॅकफूटवर फेकले. दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर या दोघांनी ४ च्या सरासरीने धावा चोपायला सुरुवात केली. पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी भारताचा तिसरा सलामीवीर ठरला, परंतु परदेशात असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ओपनर ठरला. यशस्वीपाठोपाठ रोहितनेही कसोटीतील १०वे शतक झळकावले. रोहित-यशस्वीची २२९ धावांची भागीदारी ही भारतीय सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेरील केलेली सर्वोत्तम ठरली. १९७९ मध्ये चेतन चौहान व सुनील गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्ध २१३ धावा, तर १९३६ मध्ये विजय मर्चंट व मुश्ताक अली यांनी इंग्लंडविरुद्ध २०३ धावा जोडल्या होत्या.
रोहितने शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर विकेट टाकली. विंडीजकडून पदार्पण करणाऱ्या एलिक अथारझेच्या वळणारा चेंडू रोहित सोडायला गेला, परंतु ग्लोव्ह्ज व पॅडला लागून तो हवेत उडाला. यष्टिरक्षकाने चपळाईने झेल टिपला अन् रोहित २२१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १०३ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुबमन गिल ६ धावांवर जोमेल वॉरिकनला विकेट देऊन बसला. विराट कोहलीचा झेल सुटल्याने भारताला दिलासा मिळाला. पण, यशस्वीची रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी सुरूच होती आणि त्याने १३२* धाव करताच भारताबाहेर पदार्पणातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली. त्याने सौरव गांगुलीचा ( १३१ वि. इंग्लंड, १९९६) विक्रम मोडला.
यशस्वी आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये ८५०८* धावांचा टप्पा ओलांडून वीरेंद्र सेहवागला ( ८५०३) मागे टाकले. भारताकडून सचिन तेंडुलकर ( १५९२१), राहुल द्रविड ( १३२६५), सौरव गांगुली ( १०१२२) आणि व्ही व्ही एस लक्ष्मण ( ८७८१) यांनी विराटपेक्षा कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. भारताने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ३१२ धावा करून १६२ धावांची आघाडी घेतली आहे. यशस्वी १४३ आणि विराट ३६ धावांवर नाबाद राहिले.
Web Title: IND vs WI 1st Test Live updates Marathi : India 312/2 on Day 2 Stumps, Yashasvi Jaiswal on 143* (350) & Virat Kohli on 36* (96), Rohit Sharma registered a century earlier in the day.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.