IND vs WI 1st Test Live updates Marathi : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात ४२१ धावा करून भारताने २७१ धावांची आघाडी घेतली. यजमान दुसऱ्या डावात चांगला खेळ करतील अशी अपेक्षा होती, परंतु फिरकीला पोषक खेळपट्टीवर आर अश्विन व रवींद्र जडेजाने त्यांना नाचवले. या दोघांनी मिळून तिसऱ्या दिवशी ९ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ५ विकेट्स घेणाऱ्या अश्विनने आज ७ विकेट्स घेतल्या. आठव्यांदा अश्विनने कसोटीत १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आला.
प्रचंड वळणाऱ्या खेळपट्टीवर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नाचवले. जडेजाने भारताला पहिले यश मिळवून देताना तेजनारायण चंद्रपॉलला ( १२) पायचीत केले. त्यानंतर अश्विनने दुसरा सलामीवीर व कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( २०) याची विकेट घेतली. जडेजा व अश्विन हे आलटून पालटून विंडीजला धक्के देत होते आणि त्यात मोहम्मद सिराजही आला. विंडीजचा निम्मा संघ ५८ धावांवर माघारी परतला. जेसन होल्डर अन् लोकल बॉय एलिक अथानाझे यांनी विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या डावात ४७ धावा करणाऱ्या अथानाझेने दुसऱ्या डावातही चांगले फटके मारले, परंतु २८ धावांवर अश्विनने त्याला माघारी पाठवले. त्यापाठोपाठ अल्झारी जोसेफलाही ( १३) बाद केले आणि अश्विनची ही चौथी विकेट ठरली. अश्विनने आणखी दोन विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने १० विकेट्स घेण्याची ही आठवी वेळ ठरली.
इशांत शर्मानंतर ( १०-१०८) वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत दहा विकेट्स घेणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विनने दुसरे स्थान पटकावले आहे. अनिल कुंबळे ९५३ विकेट्स सह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अश्विन ( ७०८) आणि हरभजन सिंग ( ७०७) यांचा क्रमांक येतो. अश्विनने २१.३-७-७१-७ अशी स्पेल टाकून विंडीजचा दुसरा डाव १३० धावांवर गुंडाळला. भारताने हा सामना १ डाव व १४१ धावांनी जिंकला.