IND vs WI 1st Test Live updates Marathi : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर एक डाव व १४१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी सामना होता. WTC 2023-25 या नव्या हंगामाच्या या पहिल्याच सामन्यात भारताने विजय मिळवला अन् त्याचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला. ऑस्ट्रेलिया सध्या Ashes मालिकेत इंग्लंडविरुद्ध २-१ असे आघाडीवर आहेत.
विंडीजच्या पहिल्या डावातील १५० धावांच्या प्रत्युत्तरात ४२१ धावा करून भारताने २७१ धावांची आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल ( १७१), रोहित शर्मा ( १०३) आणि विराट कोहली ( ७६) यांनी दमदार फलंदाजी केली. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनने दुसऱ्या डावात ७१ धावांत ७ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १३० धावांवर कोसळला अन् भारताने एक डाव व १४१ धावांनी सामना जिंकला. आठव्यांदा अश्विनने कसोटीत १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आला. इशांत शर्मानंतर ( १०-१०८) वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत दहा विकेट्स घेणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विनने दुसरे स्थान पटकावले आहे. अनिल कुंबळे ९५३ विकेट्स सह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अश्विन ( ७०८) आणि हरभजन सिंग ( ७०७) यांचा क्रमांक येतो. अश्विनने या सामन्यात १३१ धावांत १२ विकेट्स घेतल्या आणि परदेशातील ही भारतीय फिरकीपटूची दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. बीएस चंद्रशेखर ( १२/१०४ वि. ऑस्ट्रेलिया, १९७७ ) यांनी मेलबर्नवर इतिहास घडवला होता. अनिल कुंबळे ( १२/२७९ वि. ऑस्ट्रेलिया, २००४) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
WTC 2023-25 हंगामातील पहिलीच कसोटी जिंकून भारताने १०० टक्क्यांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया Ashes मालिकेत २-१ असे आघाडीवर असले तरी त्यांची सरासरी ही ६१.११ अशी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडची सरासरी २७.७८ अशी आहे. भारताने WTC Standing मध्ये ऑसींना दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.