India vs West Indies 1st Test Live : आर अश्विनने आज ५ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव १५० धावांवर गुंडाळला. रवींद्र जडेजाने ३ तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. अश्विनने कसोटीत ३३ वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा या नव्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले.
६१ वर्षानंतर किस्सा घडला! रोहित शर्मा 'अम्पायर'मुळे वाचला, नाहीतर होता पुन्हा अपयशाचा पाढा
कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( २०) आणि तागेनारायण चंद्रपॉल ( १२ ) यांना आर अश्विनने माघारी पाठवले. शार्दूल ठाकूरने रेयमंड रेइफर ( २) ची विकेट मिळवली आणि जडेजाने जेरमेन ब्लॅकवूड ( १४) आणि जोशुआ डा सिल्वा ( २) यांना बाद करून विंडीजचा निम्मा संघ ७६ धावांत तंबूत पाठवला. जेसन होल्डर व पदार्पणवीर एलिक अथानाझे यांनी सहाव्या विकेटसाठी १०८ चेंडूंत ४१ धावा जोडल्या. मोहम्मद सिराजने होल्डरला चूक करण्यास भाग पाडले. तो ६१ चेंडूंत १८ धावा करून बाद झाला. अथानाझेचे अर्धशतक ( ४७) थोडक्यात हुकले. विंडीजचा संघ १५० धावांत तंबूत परतला. अश्विनने २४.३-६-६०-५ अशी स्पेल टाकली.
यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही नवी जोडी सलामीला आली अन् दुसऱ्याच षटकात रोहितसाठी LBW ची जोरदार अपील झाली. विंडीजने DRS घेतला, परंतु अम्पायर्स कॉल असल्याने रोहित वाचला. यानंतर दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर चांगलेच सेट झालेले दिसले. विंडीजनेही फिरकीपटूंना लवकर गोलंदाजीला आणले. कोर्नवॉलने टाकलेले चेंडू चांगले वळताना दिसले. यशस्वी आत्मविश्वासाने खेळताना दिसला अन् दिवसाचा खेळ संपायला ७ षटकं शिल्लक असताना पाऊस आला आणि काहीवेळ सामना थांबला होता. पहिल्या दिवसअखेर भारताच्या बिनबाद ८० धावा झाल्या आहेत आणि अजूनही ७० धावांनी पिछाडीवर आहे. रोहित ३० व यशस्वी ४० धावांवर नाबाद आहे.