India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघ WTC 2023-25 च्या सर्कलमध्ये पहिली कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायला मैदानावर उतरला आहे. यशस्वी जैस्वाल व इशान किशन या दोन युवा खेळाडूंना आज पदार्पणाची संधी दिली गेली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर आतापर्यंत त्यांनी चांगली खेळी केलेली पाहायला मिळतेय. भारतीय संघात सध्या बदलाचे वारे आहेत, परंतु विराट कोहलीने ( Virat Kohli) नाणे आजही खणखणीत वाजले. आतापर्यंत महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्या नावावर असणारा युनिक विक्रम, आज विराटच्या नावावर नोंदवला गेला.
यशस्वी, इशानचे नाव गाजले! भारताच्या ७७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पाचव्यांदाच असे घडले
विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनचे अनेक विक्रम मोडले आहेत. सचिनचा १०० शतकांचा विक्रमही विराट मोडेल ( ७२ शतकं) असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. पण, आज कोहलीने सचिनच्या एका युनिक विक्रमाच्या पंक्तित स्वतःचे नाव सामील करून घेतले आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये वडील व मुलगा यांच्याविरुद्ध खेळणारा विराट हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने १९९२ मध्ये जॉफ मार्श आणि २०११-१२ मध्ये त्यांचा मुलगा शॉन मार्श यांच्याविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळले होते. १९९२ साली तेंडुलकर प्रथमच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी खेळायला गेला होता आणि ती मालिका जॉफ यांची शेवटची होती. दुसरीकडे २०११/१२ मध्ये शॉन प्रथम भारताविरुद्ध कसोटी खेळत होता आणि सचिनचा तो शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. (IND vs WI 1st Test Live Scoreboard )
आज विराटने असा पराक्रम नोंदवला. २०११ मध्ये जेव्हा भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर आला होता तेव्हा शिवनारायण चंद्रपॉल यजमान संघाचा सदस्य होता आणि तेव्हा कोहलीने कसोटीत पदार्पण केले होते. आज शिवनारायणचा मुलगा तागेनारायण भारताविरुद्ध खेळतोय.. त्याने ९ कसोटीत ४५.३० च्या सरासरीने ४५३ धावा केल्या आहेत.