IND vs WI 1st Test Live updates Marathi : यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी १६२ धावांची आघाडी घेतली. बऱ्याच वर्षांनी रोहितचे शतक पाहून चाहते सुखावते, परंतु त्यापेक्षा अधिक आनंद झाला तो पदार्पणवीर यशस्वीची फटकेबाजी पाहून. २१ वर्षीय खेळाडूनं शतक झळकावताना विक्रमांचा पाऊस पाडला आणि आता त्याला विराट कोहलीची साथ मिळाली आहे.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव १५० धावांवर गुंडाळला गेला अन् भारताकडून रोहित-यशस्वी या नव्या ओपनिंग जोडीने २२९ धावांची भागीदारी करून विक्रमी कामगिरी केली. वेस्ट इंडिजमधील भारताच्या सलामीवीरांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोहित २२१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १०३ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुबमन गिल ६ धावांवर जोमेल वॉरिकनला विकेट देऊन बसला. विराटलाही सुरुवातीला जीवदान मिळाले आणि त्याने दिवसअखेर यशस्वीसह २०८ चेंडूंत ७२ धावा जोडल्या. भारताने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ३१२ धावा केल्या होत्या.
कालच्या नाबाद १४२ धावांवरून पुढे खेळताना यशस्वीने आज १५० धावा पूर्ण केल्या. कसोटी पदार्पणात भारताकडून १५०+ धावा करणारा यशस्वी तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी शिखर धवन ( १८७ वि. ऑस्ट्रेलिया २०१३) आणि रोहित शर्मा ( १७७ वि. वेस्ट इंडिज, २०१३) यांनी असा पराक्रम केला होता. भारताबाहेर कसोटी पदार्पणात ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी १९९६ मध्ये सौरव गांगुलीने इंग्लंडविरुद्ध १३१ धावा केल्या होत्या.