yashasvi jaiswal century photo : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाने वर्चस्व राखले. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कॅरेबियन संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. तर दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी शतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले आहे.
पहिल्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने दिग्गज सुनिल गावस्कर यांसारख्या महान फलंदाजांचा विक्रम मोडित काढला. तो एकमेव सलामीवीर ठरला आहे, ज्याने पदार्पणाच्या सामन्यात विदेशी जमिनीवर शतक झळकावले आहे. यशस्वी जैस्वाल १४३ धावांची विक्रमी खेळी करून खेळपट्टीवर टिकून आहे. सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर जैस्वालच्या यशस्वी खेळीचे भारतीय खेळाडूंनी कौतुक केले. प्रशिक्षक राहुल द्रविड यांपासून सर्व स्टाफने युवा शिलेदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
युवा खेळाडूला कडक सॅल्युट
युवा यशस्वी जैस्वाल आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या बळीसाठी २२९ धावांची भागीदारी नोंदवली. रोहित १०३ धावा करून बाद झाला. तर जैस्वाल १४३ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. ३५० चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने यशस्वीने १४३ धावा कुटल्या.
पहिल्या सामन्यात भारताचा दबदबा यजमान वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॅरेबियन संघ पहिल्या डावात १५० धावांत गुंडाळला गेला. यजमान संघाला प्रत्युत्तर देताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (१०३) आणि यशस्वी जैस्वाल (१४३*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर २ गडी गमावून भारतीय संघाने ३१२ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे दुसऱ्या दिवसाअखेर १६२ धावांची आघाडी आहे.