Join us  

IND vs WI : संघर्षाची 'यशस्वी' कहाणी! शतकी खेळी आई-वडिलांना समर्पित; जैस्वाल भावुक

ind vs wi 2023 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 1:03 PM

Open in App

yashasvi jaiswal century : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना सध्या सुरू आहे. या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने दिग्गज सुनिल गावस्कर यांसारख्या महान फलंदाजांचा विक्रम मोडित काढला. तो एकमेव सलामीवीर ठरला आहे, ज्याने पदार्पणाच्या सामन्यात विदेशी जमिनीवर शतक झळकावले आहे. 

यशस्वी जैस्वाल १४३ धावांची विक्रमी खेळी करून खेळपट्टीवर टिकून आहे. सामन्यानंतर बोलताना शतकवीर भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वी (१४३*) तंबूत परतला.  सामन्यानंतर बोलताना आपले जुने दिवस आठवून त्याचे डोळे पाणावल्याचे दिसले. भावुक यशस्वीचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला असून त्याने आपली ऐतिहासिक खेळी आपल्या आई-वडिलांना समर्पित केली.

यशस्वी जैस्वाल भावुकयशस्वी जैस्वालने म्हटले, "हा क्षण खरोखरच खूप भावनिक आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि त्या सर्वांसाठी ज्यांनी मला प्रत्येक पावलावर साथ दिली आहे, कारण माझा इथपर्यंतचा प्रवास मोठा आहे. मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी मला मदत केली. मी ही शतकी खेळी माझ्या आई-वडिलांना समर्पित करू इच्छितो. माझ्या आयुष्यात त्यांचे खूप योगदान आहे. ते देव आहेत... ही फक्त सुरुवात आहे. अजून पुढे खूप काही करायचे आहे."

भारत मजबूत स्थितीतसध्या सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॅरेबियन संघ पहिल्या डावात १५० धावांत गुंडाळला गेला. यजमान संघाला प्रत्युत्तर देताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (१०३) आणि यशस्वी जैस्वाल (१४३*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर २ गडी गमावून भारतीय संघाने ३१२ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे दुसऱ्या दिवसाअखेर १६२ धावांची आघाडी आहे.

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App