ravichandran ashwin on WTC final 2023 : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय संघाने यजमान संघाची पळता भुई थोडी केली. रवीचंद्रन अश्विनने कॅरेबियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. अलीकडेच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवत जगज्जेतेपद पटकावले. तेव्हा अश्विनला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. पण विडिंजविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने ६० धावा देत ५ बळी घेतले.
दरम्यान, अप्रतिम स्पेल टाकल्यानंतर अश्विनने WTC फायनलमधील पराभवाबद्दल भाष्य केले. महत्त्वाच्या सामन्यातील पराभवावर अश्विनने नाराजी व्यक्त करत अखेर याप्रकरणी मौन सोडले. "सध्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट होत आहे, जगभरात लीग क्रिकेट होत आहे. पण मी नेहमी वर्तमान परिस्थितीत वावरत असतो. WTC च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला हे निराशाजनक आहे. आम्ही दोनवेळा अंतिम फेरी गाठली पण विजय मिळवू शकलो नाही. एक-दोन दिवस खराब खेळ राहिला अन् ट्रॉफी आमच्यापासून दूर गेली. मी वेस्ट इंडिजविरूद्ध केलेली कामगिरी माझा आत्मविश्वास वाढवेल. जे मी आणि संघाने केले त्याचा मला आनंद आहे", असे अश्विनने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हटले.
"मी नाराज झालो तर युवा खेळाडू आणि माझ्यात फरक काय?"अश्विनने आणखी सांगितले की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संधी न मिळाल्याने मी नाराज नाही. जर मी ड्रेसिंग रूममध्ये नाराज झालो असतो तर माझ्यात आणि युवा खेळाडूंमध्ये काय फरक राहिला असता. मी मानसिक आणि शारिरीकरित्या हा सामना खेळण्यासाठी तयार होतो. तसेच बाकावर बसण्यासाठी देखील मी तयारी केली होती.
यजमान संघ १५० धावांत गडगडला पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १५० धावांत गारद झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीनंतर भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला तंबूत पाठवले. वेस्ट इंडिजकडून एलिक अथानाजने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. ही एलिकची पदार्पण कसोटी आहे. भारतासाठी फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. रवींद्र जडेजाने ३ तर अश्विनने ५ फलंदाजांना बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ८० धावा केल्या आहेत. संघात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे दोन्ही सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर टिकून आहेत. वेस्ट इंडिजकडे आता पहिल्या डावात केवळ ७० धावांची आघाडी आहे.