भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघामध्ये सध्या एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेती पहिल्या सामन्यात भारताने बाजी मारली आहे. तर दुसरा सामना आज केन्सिंग्टन ओव्हल बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघ आणि क्रिकेटप्रेमींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सामन्यादरम्यान बार्बाडोसमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर पावसाची शक्यता ५० टक्के आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरू होण्याची शक्यता आहे. तर बार्बाडोसमध्ये सकाळी १० ते दुपारी १२ या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी ४ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाऊस पडू शकतो.
बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलची खेळपट्टी दुसऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना अनुकूल ठरू शकते. मालिकेतील पहिला सामनाही इथेच खेळवला गेला होता. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी भेदक मारा केला होता. पहिल्या सामन्यात पडलेल्या एकूण १५ विकेट्सपैकी १० विकेट्स फिरकी गोलंदाजांनी काढल्या होत्या. जर या सामन्यातही फिरकी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी असेल तर हा सामनाही कमी धावसंख्येचा ठरू शकतो.