IND vs WI 2nd ODI Live Marathi : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याशिवाय भारतीय संघ कमकुवत असल्याची प्रचिती आज आली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र न ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाने टीम इंडियाला आरसा दाखवला. ज्या युवा खेळाडूंच्या भरवशावर भारतीय संघ आज मैदानावर उतरला, त्यांनी निराश केले. इशान किशन ( Ishan Kishan) वगळल्यास सर्व फलंदाज अपयशी ठरले. संजू सॅमसनला पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही.
रोहित व विराट यांना विश्रांती दिल्याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मैदानावर उतरला. इशान किशन व शुबमन गिल यांनी ९० धावांची सलामी दिली. पण, गिल ३४ धावांवर झेलबाद झाला अन् पुढील १३ धावांत विंडीजने ५ विकेट्स मिळवल्या. बिनबाद ९० वरून भारताची अवस्था ५ बाद ११३ अशी झाली. इशानने ५५ धावा केल्या. अक्षर पटेल ( १), हार्दिक ( ७), संजू सॅमसन ( ९) हे झटपट माघारी परतले. शेफर्डने ३२व्या षटकात रवींद्र जडेजा ( १०) व सूर्यकुमार यांची ३३ धावांची भागीदारी तोडली व भारताला सहावा धक्का बसला. सेट फलंदाज सूर्यकुमारही ( २४) मोतीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शार्दूल ठाकूरने १६ धावा करून पडझड थांबवली, परंतु गोलंदाजीला अल्झारी जोसेफ येताच भारताची विकेट पडली.