IND vs WI 2nd ODI Live Marathi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना आज खेळला जात आहे. भारताने पहिल्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ आज सामना जिंकून बरोबरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने आता प्रत्येक वन डे सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. त्यात संघ व्यवस्थापन काही प्रयोग करताना दिसत आहेत आणि आजही त्याची प्रचिती आली, परंतु चाहत्यांनी राहुल द्रविडची शाळा घेतली.
नाणेफेकीसाठी रोहितएवजी हार्दिक पांड्या आला आणि रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती दिली गेली आहे. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी दिली गेली आहे. त्यामुळे आजही इशान किशन व शुबमन गिल ही जोडी सलामीला खेळताना दिसली आणि त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मागील काही सामन्यांत फॉर्म हरवलेला गिल आज चांगले फटके मारताना दिसला अन् त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०० धावांचा टप्पा ओलांडला.
सुरुवातील सावध खेळ करणाऱ्या इशान किशनने हळुहळू त्याची नैसर्गिक फटकेबाजी सुरू केली. इशान किशनने ५१ चेंडूंत वन डे क्रिकेटमधील पाचवे अर्धशतक झळकावले. गिलही आक्रमक खेळ करायला गेला, परंतु गुडाकेश मोटीचा वळलेल्या चेंडूवर त्याने मारलेला फटका थोडक्यात चुकला. ३४ धावा करणारा गिल अल्झारी जोसेफच्या हाती झेल देऊन माघारी परतला अन् भारताला ९० धावांववर पहिला धक्का बसला. पुढच्याच षटकात इशान ( ५५) बाद झाला. रोमारिओ शेफर्डच्या गोलंदाजीवर अथानेझने अप्रतिम झेल टिपला. चौथ्या क्रमांकावर अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला अन् शेफर्डच्या बाऊन्सरवर अक्षर ( १) झेलबाद झाला. आतातरी सूर्यकुमार यादव फलंदाजीला येईल, अशी आशाही फोल ठरली. हार्दिक पांड्या व संजू सॅमसन खेळत आहेत.