IND vs WI 2nd ODI Live Marathi : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याशिवाय भारतीय संघाची फलंदाजी कमकुवत असल्याची प्रचिती आज आली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र न ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाने टीम इंडियाला आरसा दाखवला. इशान किशन ( Ishan Kishan) वगळल्यास सर्व फलंदाज अपयशी ठरले. शार्दूल ठाकूरने ३ विकेट्स घेत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते, परंतु विंडीज कर्णधार शे होपने जबाबदारीने खेळ करून विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
रोहित व विराट यांना विश्रांती दिल्याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मैदानावर उतरला. इशान किशन ( ५२) व शुबमन गिल ( ३४) यांनी ९० धावांची सलामी दिली. पण, पहिली विकेट पडली अन् भारताचा संपूर्ण संघ पुढील ९१ धावांत तंबूत परतला. संजू सॅमसनला पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. अक्षर पटेल ( १), हार्दिक ( ७), सॅमसन ( ९), रवींद्र जडेजा ( १०), सूर्यकुमार यादव ( २४), शार्दूल ठाकूर ( १६) यांना फार काही करता आले नाही. गुडाकेश मोती व रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. भारतीय संघ ४०.५ षटकांत सर्वबाद १८१ धावांवर गडगडला.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कायल मेयर्सने भारतीय गोलंदाजांचे चौकार-षटकारांनी स्वागत केले. मेयर्सने मारलेले नटराज फटके विंडीजच्या जुन्या क्रिकेटची आठवण करून देणारे होते. ९व्या षटकात शार्दूल ठाकूरने तिसऱ्या चेंडूवर मेयर्सला माघारी पाठवले. विंडीजला ५३ धावांवर पहिला धक्का बसला अन् त्यात ३६ धावा ( २८ चेंडू, ४ चौकार व २ षटकार) या मेयर्सच्या होत्या. शार्दूलने त्याच षटकात चौथ्या चेंडूवर सेट फलंदाज ब्रेंडन किंगला ( १५) पायचीत केले. पुढच्याच षटकात एलिक एथेनेजला ( ६) बाऊन्सरवर शार्दूलने माघारी पाठवून विंडीजला तिसरा धक्का दिला. कुलदीप यादवच्या पहिल्याच चेंडूवर शे होपचा शॉर्ट लेगला सूर्यकुमारकडून झेल सुटला.
कुलदीप यादवने चेंडू अप्रतिम वळवला अन् शिमरोन हेटमायरचा ( ९) त्रिफळा उडवला. पण, शे होप व किसी कार्टी यांनी विंडीजचा डाव सावरला. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीने वेस्ट इंडिजच्या आशा पल्लवीत केल्या. होपने ७१ चेंडूंत वन डे तील २४वे अर्धशतक पूर्ण केले. विंडीजला विजयासाठी ८ धावांची गरज असताना कार्टीचा झेल कुलदीपकडून सुटला. त्यानंतर कार्टीने सलग दोन चौकार खेचून वेस्ट इंडिजला ६ विकेट्स व ८० चेंडू राखून विजय मिळवून दिला. होप ( ६३*) व कार्टी ( ४८*) यांनी मॅच विनिंग ९१ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजने ३६.४ षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या.