IND vs WI 2nd ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी युवा खेळाडूंना पुरेपूर संधी मिळावी यादृष्टीने भारतीय संघ व्यवस्थापन काम करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात अनुभवी रोहित शर्मा ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर विराट कोहलीने फलंदाजीही केली नाही. तेच आजच्या दुसऱ्या सामन्यात रोहित व विराटने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला अन् संजू सॅमसन व अक्षर पटेल यांना संधी दिली. पण, विराटच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. स्टार खेळाडू असूनही विराट सहकाऱ्यांसाठी ड्रिंक्स ब्रेकमध्ये पाणी घेऊन आलेला दिसला. विराटचा हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी त्याला पुन्हा डोक्यावर घेतले.
रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याशिवाय भारतीय संघ कमकुवत असल्याची प्रचिती आज आली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र न ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाने टीम इंडियाला आरसा दाखवला. इशान किशन ( Ishan Kishan) वगळल्यास सर्व फलंदाज अपयशी ठरले. संजू सॅमसनला पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. रोहित व विराट यांना विश्रांती दिल्याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मैदानावर उतरला. इशान किशन ( ५२) व शुबमन गिल ( ३४) यांनी ९० धावांची सलामी दिली. पण, पहिली विकेट पडली अन् भारताचा संपूर्ण संघ पुढील ९१ धावांत तंबूत परतला. अक्षर पटेल ( १), हार्दिक ( ७), संजू सॅमसन ( ९), रवींद्र जडेजा ( १०), सूर्यकुमार यादव ( २४), शार्दूल ठाकूर ( १६) यांना फार काही करता आले नाही. गुडाकेश मोती व रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.