India vs West Indies, 2nd ODI Live Updates : १००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने ( Shai Hope ) आणि कायले मेयर्स यांनी दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. दीपक हुडाने ही मजबूत भागीदारी मोडली, परंतु खरी कमाल अक्षर पटेल व युजवेंद्र चहलने केली. ३ धावांच्या अंतराने या दोघांनी वेस्ट इंडिजला दोन मोठे धक्के दिले. विशेष बाब म्हणजे शिखर धवनने हे दोन्ही झेल घेतले आणि टीम इंडियाला पुनरागमन मिळवून दिले.
वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात भारताला कडवी टक्कर दिली. नशीब बाजूने होते म्हणून भारताने पहिला सामना ३ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर भारताची मधली फळी ढेपाळली. त्यामुळे दुसऱ्या वन डेत संजू सॅमसन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. जलदगती गोलंदाज आवेश खान ( Avesh Khan) आज पदार्पण करणार आहे. प्रसिद्ध कृष्णाला आज विश्रांती देण्यात आली आहे.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. १००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होप आणि मागील सामन्यातील स्टार फलंदाज कायले मेयर्स यांनी विंडीजला आश्वासक सुरूवात करून दिली. मोहम्मद सिराज, आवेश खान यांचा जलद मारा ही दोघं सहज परतवून लावताना दिसत होते. पण, १०व्या षटकात दीपक हुडा गोलंदाजीला आला अन् पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. मेयर्स २३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ३९ धावांवर बाद झाला आणि पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.