India vs West Indies, 2nd ODI Live Updates : शुबमन गिल वगळता आज भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अपयशी ठरले. ३ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना समोर ३१२ धावांचा डोंगर सर करण्याचे लक्ष्य भारतासमोर होते. संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडताना भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण, दोघेही वैयक्तिक अर्धशतक झळकावून दुर्दैवीरित्या बाद झाले. अक्षर पटेल व दीपक हुडा यांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून भारताचा संघर्ष सुरू ठेवला होता. दीपकच्या विकेटनंतर अक्षरची गाडी सुसाट सुटली अन् त्याने विंडीज गोलंदाजांची धुलाई केली. भारताला रोमहर्षक विजय मिळवून देताना मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली.
१००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने ( Shai Hope) आज भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने कायले मेयर्स ( ३९) सह ६५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर होपने शामार्ह ब्रुक्स ( ३५)सह ६२ धावांची आणि कर्णधार निकोलस पूरनसह ११७ धावा जोडल्या. पूरन ७७ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर त्रिफळाचीत झाला. होपने त्यानंतर खणखणीत षटकार खेचून शतक पूर्ण केले. १००व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा होप हा जगातील दहावा आणि विंडीजचा चौथा फलंदाज ठरला. होप १३५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ११५ धावांवर शार्दूलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विंडीजने ६ बाद ३११ धावा केल्या. शार्दूलने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या
शिखर धवन ( १३), सूर्यकुमार यादव (९) व शुबमन गिल ( ४३) हे ७९ धावांवर माघारी परतले. संजू व श्रेयस या जोडीने संयमी खेळ करताना आधी खेळपट्टीवर स्वतःला सेट केले. श्रेयसने ५७ चेंडूंत ११वे अर्धशतक पूर्ण केले. संजू-श्रेयस यांची ९४ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी अल्झारी जोसेफने संपुष्टात आणली. श्रेयस ७१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ६३ धावांवर बाद झाला. संजूने ४७ चेंडूंत वन डे तील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ३९व्या षटकात संजूची दुर्दैवी विकेट पडली. संजूला ५४ धावांवर रन आऊट होऊन माघारी जावे लागले. त्याने ३ चौकार व ३ षटकार खेचले.
दीपक हुडा व अक्षर पटेल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. या दोघांनी ३३ चेंडूंत ५१ धावा जोडून त्या जबाबदारीला न्याय दिला. या भागीदारीत अक्षरने १९ चेंडूंत ३३ धावा कुटल्या. अकिल हौसेनने ही जोडी तोडली आणि दीपक ३३ धावांवर झेलबाद झाला. अक्षर उभ्या उभ्या षटकार खेचून विंडीजच्या स्वप्नांना तडा देत होता. अल्झारी जोसेफने ४६ व्या षटकात १६ धावा दिल्या, परंतु पाचव्या चेंडूवर शार्दूल ठाकूरची विकेट घेतली. आता भारताला २४ चेंडूंत ३२ धावा करायच्या होत्या. अक्षरने सलग दोन चौकार खेचून २७ चेंडूंत वन डेतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या या अर्धशतकात ४ षटकार व ३ चौकारांचा समावेश होता. वन डेतील विंडीजविरुद्धचे भारतीय खेळाडूचे हे सर्वात जलद अर्धशतक ठरले.
१८ चेंडू १९ धावा असा सामना जवळ आला. जोसेफने ४ धावा दिल्याने १२ चेंडूंत १५ धावा असा सामना चुरशीचा झाला. आवेश खाननेही चांगले चौकार खेचले आणि अक्षरवरील दडपण कमी केले. आवेश १० धावा करून बाद झाला अन् भारताला अखेरच्या षटकात ८ धावांची गरज होती. मेयर्सने पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर १ धावा आल्याने मोहम्मद सिराज स्ट्राईकवर आला. सिराने १ धाव घेऊन अक्षरला स्ट्राईल दिली. अक्षरने षटकार खेचून भारताचा विजय पक्का केला. अक्षरने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६४ धावा करताना भारताला २ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
Web Title: IND vs WI, 2nd ODI Live Updates : Axar Patel is the hero of India, need 6 from 3 balls and he smashed a six, he score 64* (35) with 3 fours and 5 sixes, india take 2-0 lead in series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.