India vs West Indies, 2nd ODI Live Updates : दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया आज एक बदलासह मैदानावर उतरलेली दिसली. प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) याच्या जागी आज आवेश खानने ( Avesh Khan) पदार्पण केले. पण, प्रत्यक्ष सामन्यात 'प्रसिद्ध' नावाची जर्सी घातलेला खेळाडू गोलंदाजी करताना दिसला अन् गोंधळ उडाला.
१००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होप आणि कायले मेयर्स यांनी विंडीजला आश्वासक सुरूवात करून दिली. मोहम्मद सिराज, आवेश खान यांचा जलद मारा ही दोघं सहज परतवून लावताना दिसत होते. पण, १०व्या षटकात दीपक हुडा गोलंदाजीला आला अन् पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. मेयर्स २३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ३९ धावांवर बाद झाला आणि पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
होप आणि शामार्ह ब्रुक्स यांनी धावांचा वेग वाढवताना ७४ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. होपने ६९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पुन्हा एकदा गोलंदाजीत केलेला बदल कामी आला अन् अक्षर पटेलने यजमानांना दुसरा धक्का दिला. ब्रुक्स ३६ चेंडूंत ३५ धावांवर स्लिपमध्ये शिखर धवनच्या हाती झेलबाद झाला. १२७ धावांवर विंडीजचा दुसरा फलंदाज माघारी परतला. युजवेंद्र चहलने पुढील षटकात ब्रेंडन किंगला भोपळ्यावर माघारी जाण्यास भाग पाडले. ३ धावांच्या अंतराने विंडीजचे दोन फलंदाज माघारी परतले.
या सामन्यात दीपक हुडा हा प्रसिद्धची जर्सी घालून मैदानावर उतरला. त्याने तिच जर्सी घालून गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकात विकेटही मिळवली.
Web Title: IND vs WI, 2nd ODI Live Updates : Deepak Hooda wearing Prasidh Krishna's jersey
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.