India vs West Indies, 2nd ODI Live Updates : दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाची आघाडीची व तळाची फळी अपयशी ठरली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना भारताला ९ बाद २३७ धावांपर्यंतच मजल मारू दिली. लोकेश राहुल ( ४९) व सूर्यकुमार यादव ( ६४) यांनी मधल्या फळीत डाव सावरल्यामुळे इथपर्यंत यजमानांना पोहोचता आले. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती, परंतु प्रसिद्ध कृष्णाने ( Prasidh Krishna ) ७ चेंडूत त्यांचे दोन फलंदाज माघारी पाठवले. यात पुन्हा एकदा रोहित शर्माचा DRS घेण्याचा निर्णय योग्य ठरला. यावेळेस कर्णधार रोहितनं यष्टिरक्षक रिषभ पंतचे ऐकले आणि सलग दोन सामन्यांत त्याचा चौथा DRS चा निर्णय अचूक ठरला.
लोकेश ४८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर स्वतःच्या चूकीमुळे रनआऊट झाला. सूर्यकुमारने ८३ चेंडूंत ५ चौकारांसह ६४ धावा केल्या. सूर्याने ६व्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरसह ४३ धावा जोडल्या. दीपक हुडाने अखेरच्या षटकांत चांगली खेळी करताना भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हुडा २५ चेंडूंत २९ धावांवर बाद झाला. भारताला ५० षटकांत ९ बाद २३७ धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना शे होप आणि ब्रेंडन किंग यांनी सावध सुरुवात केली. पण, ८व्या षटकात कर्णधार रोहितने प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीला बोलावले. ८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने किंगला ( १८) यष्टिरक्षक रिषभकरवी झेलबाद केले. त्यानंतर १०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॅरेन ब्राव्हो ( १) बाद झाला. मैदानावरील अम्पायरने ब्राव्होला नाबाद दिले होते. पण, रिषभ प प्रसिद्धने कॅचसाठी जोरदार अपील केले. रिषभने राजी केल्यानंतर रोहितने DRS घेतला आणि त्यात बॅट पॅडलला नाही तर चेंडूला लागण्याचे दिसले आणि ब्राव्होला माघारी जावे लागले.