India vs West Indies, 2nd ODI Live Updates : तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात सुरुवातीलाच धक्के बसले आहेत. लोकेश राहुलचे पुनरागमन झाल्यामुळे मागील सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या इशान किशनला बाकावर बसावे लागले. वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डलाही आजच्या सामन्याला मुकावे लागले आणि निकोलस पूरनकडे नेतृत्वाची जबाबदारी आली. पोलार्डच्या जागी संघात स्थान मिळालेल्या ओडीन स्मिथने ( Odean Smith) टीम इंडियाची वाट लावली. १२व्या षटकाच्या पहिल्या व सहाव्या चेंडूवर मोठे धक्के दिले.
किरॉन पोलार्डच्या अनुपस्थितित आज निकोलस पूरनने वेस्ट इंडिज संघाच्या नेतृत्वाची कमान सांभाळली. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्यात कर्णधार रोहित शर्माने मोठा डाव टाकला. लोकेश राहुलचे पुनरागमन होऊनही रोहितने सलामीला रिषभ पंतला उतरवले. लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन घेऊन उतरलेल्या टीम इंडियाला मात्र चांगली सुरूवात करता आली नाही. केमार रोचचा बाऊन्सरचा अंदाज घेण्यात रोहित चुकला अन् अवघ्या ५ धावा करून तो माघारी परतला. रिषभ व विराट कोहली यांनी सावध खेळ करताना भारताच्या डावाला आकार दिला. पण सलामीला खेळण्याची संधी मिळालेला रिषभ पंत अपयशी ठरला आणि अवघ्या १८ धावा करून तो माघारी परतला.
१२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभने उत्तुंग फटका मारला, परंतु जेसन होल्डरने धाव घेत सुरेख झेल टिपला. त्यानंतर ओडी स्मिथने पुढील चार चेंडू वेगवेगळ्या प्रकारे फेकले आणि सहाव्या चेंडूवर विराटची विकेट घेतली. विराट ३० चेंडूंत ३ चौकारांसह १८ धावांवर बाद झाला. भारताच्या १२ षटकांत ३ बाद ४३ धावा झाल्या आहेत.