India vs West Indies, 2nd ODI Live Updates : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फुल टाईम वन डे नेतृत्वाखाली भारताने पहिली मालिका जिंकली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने ४४ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल यांनी फलंदाजीत टीम इंडियाचा डाव सावरल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजीत प्रभाव पाडला. त्याला अन्य गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. प्रसिद्धने ९ षटकांत १२ धावा देताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने तीन षटकं निर्धाव टाकली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मागील ११ वन डे सामन्यांत विजय मिळवला आहे. २००६ मध्ये त्यांना विंडीजकडून अखेरचा मालिका पराभव पत्करावा लागला होता.
दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाची आघाडीची व तळाची फळी अपयशी ठरली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना भारताला ९ बाद २३७ धावांपर्यंतच मजल मारू दिली. लोकेश राहुल ( ४९) व सूर्यकुमार यादव ( ६४) यांनी मधल्या फळीत डाव सावरल्यामुळे इथपर्यंत यजमानांना पोहोचता आले. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा ( ५) व रिषभ पंत ( १८) सलामीला आले, परंतु हा डाव फसला. १२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभने ( १८) उत्तुंग फटका मारला, परंतु जेसन होल्डरने धाव घेत सुरेख झेल टिपला. त्यानंतर ओडीन स्मिथने पुढील चार चेंडू वेगवेगळ्या प्रकारे फेकले आणि सहाव्या चेंडूवर विराटची ( १८) विकेट घेतली.
भारताच्या १२ षटकांत ३ बाद ४३ धावा झाल्या होत्या. लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी सावध खेळ करताना चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. लोकेश ४८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर स्वतःच्या चूकीमुळे रनआऊट झाला. सूर्यकुमारने ८३ चेंडूंत ५ चौकारांसह ६४ धावा केल्या. सूर्याने ६व्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदरसह ४३ धावा जोडल्या. दीपक हुडाने अखेरच्या षटकांत चांगली खेळी करताना भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हुडा २५ चेंडूंत २९ धावांवर बाद झाला. भारताला ५० षटकांत ९ बाद २३७ धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना शे होप आणि ब्रेंडन किंग यांनी सावध सुरुवात केली. पण, ८व्या षटकात कर्णधार रोहितने प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीला बोलावले. ८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने किंगला ( १८) यष्टिरक्षक रिषभकरवी झेलबाद केले. त्यानंतर १०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॅरेन ब्राव्हो ( १) बाद झाला. मैदानावरील अम्पायरने ब्राव्होला नाबाद दिले होते. पण, रिषभ प प्रसिद्धने कॅचसाठी जोरदार अपील केले. रिषभने राजी केल्यानंतर रोहितने DRS घेतला आणि त्यात बॅट पॅडलला नाही तर चेंडूला लागण्याचे दिसले आणि ब्राव्होला माघारी जावे लागले. युझवेंद्र चहलने आणखी एक धक्का देताना शे होपला ( २७) माघारी पाठवले. शार्दूल ठाकूरने चतुराईने जेसन होल्डरला ( २) बाद करून विंडीजची अवस्था ५ बाद ७६ अशी केली.
शामर्ह ब्रुक्स व अकिल होसैन ही जोडी टीम इंडियासाठी डोईजड झालेली दिसली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. रोहितने गोलंदाजीत बदल करताना दीपक हुडाला पाचारण केले आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. हुडाने पहिल्याच षटकात विंडीजला मोठा धक्का दिला. ब्रुक्स ६४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच षटक निर्धाव फेकून हुडाने विकेट घेतली आणि त्यानंतर विराट कोहलीला कडकडून मिठी मारली.
अकिल होसैन आणि फॅबियन अॅलन यांनी सातव्या विकेटसाठी फटकेबाजी करताना ४९ चेंडूंत ४२ धावा जोडल्या. पण, पुन्हा एकदा गोलंदाजीतील बदल यशस्वी ठरला. मोहम्मद सिराजने विंडीजच्या फॅबियनला ( १३) माघारी पाठवले. त्यानंतर पुढच्याच षटकात शार्दूल ठाकूरने विकेट घेतली. होसैन ५२ चेंडूंत ३ चौकारांसह ३४ धावांवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने वेस्ट इंडिजची अखेरचा आशास्थान असलेल्या ओडीन स्मिथला माघारी पाठवले. ओडीनचा ( २४) सुरेख झेल विराट कोहलीने टिपला. प्रसिद्धने १०वा फलंदाज बाद करून विंडीजचा डाव १९३ धावांवर गुंडाळला.
Web Title: IND vs WI, 2nd ODI Live Updates: Rohit Sharma era as a captain in ODI starts with a series win, beat West Indies by 44 runs and won the series 2-0 with 1 match left in the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.