India vs West Indies, 2nd ODI Live Updates : शे होपने ( Shai Hope) त्याच्या १००व्या वन डे सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. खेळपट्टीवर शड्डू ठोकून त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. वैयक्तिक खेळीसह त्याने सहकाऱ्यांसोबत विविध विकेट्ससाठी मजबूत भागीदारी केली. कायले मेयर्स, शामार्ह ब्रुक्स व कर्णधार निकोलस पूरन यांच्यासह त्याने शतकी भागीदारी करताना धावांचा वेग मंदावू दिला नाही. पूरन ७४ धावांवर माघारी परतल्यानंतर होपने अखेरपर्यंत खिंड लढवली. होपने १३ वे शतक झळकावताना वन डे क्रिकेटमध्ये अनोख्या 'डबल सेंच्युरी'ची नोंद केली. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने भारतासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
१००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होप आणि कायले मेयर्स यांनी विंडीजला आश्वासक सुरूवात करून दिली. मोहम्मद सिराज, आवेश खान यांचा जलद मारा ही दोघं सहज परतवून लावताना दिसत होते. पण, १०व्या षटकात दीपक हुडा गोलंदाजीला आला अन् पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. मेयर्स २३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ३९ धावांवर बाद झाला आणि पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. होप आणि शामार्ह ब्रुक्स यांनी धावांचा वेग वाढवताना ७४ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केली. होपने ६९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पुन्हा एकदा गोलंदाजीत केलेला बदल कामी आला अन् अक्षर पटेलने यजमानांना दुसरा धक्का दिला. ब्रुक्स ३६ चेंडूंत ३५ धावांवर स्लिपमध्ये शिखर धवनच्या हाती झेलबाद झाला. १२७ धावांवर विंडीजचा दुसरा फलंदाज माघारी परतला. युजवेंद्र चहलने पुढील षटकात ब्रेंडन किंगला भोपळ्यावर माघारी जाण्यास भाग पाडले. ३ धावांच्या अंतराने विंडीजचे दोन फलंदाज माघारी परतले.
होपने त्यानंतर खणखणीत षटकार खेचून शतक पूर्ण केले. १००व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा होप हा जगातील दहावा आणि विंडीजचा चौथा फलंदाज ठरला. याआधी गॉर्डन ग्रिनिज ( १०२* वि. पाकिस्तान, १९८८), ख्रिस गेल ( १३२* वि. इंग्लंड, २००४) आणि रामनरेश सारवान ( ११५* वि. भारत, २००६) यांनी हा पराक्रम केला आहे. शार्दूलने आणखी एक धक्का देताना रोव्हमन पॉवेलला ( १३) बाद करून होपसोबतची त्याची १८ चेंडूंवरील ३३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पण, होपने जबरदस्त बॅटिंग केली. होप १३५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ११५ धावांवर शार्दूलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विंडीजने ६ बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला.