Join us  

Shubman Gill, IND vs WI, 2nd ODI Live Updates : शुबमन गिलची विचित्र विकेट! स्कूप मारण्याचा प्रयत्न फसला; सूर्यकुमार यादवला 'तो' मोह नडला, Video 

Shubman Gill, IND vs WI, 2nd ODI Live Updates : शिखर धवन ( Shikhar Dhawan) व शुबमन गिल यांना ११ षटकांत ४८ धावा करता आल्या. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर जणू गळती लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 7:35 AM

Open in App

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर गोलंदाजांनीही भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. कायले मेयर्स ( Kyle Mayers ) ने कमाल करताना भारताच्या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. घेतल्या म्हणण्यापेक्षा भारतीय फलंदाजांनी त्या विकेट टाकल्या. शुबमन गिल ( Shubman Gill) तर विचित्र पद्धतीने बाद झाला. सूर्यकुमार यादवही उगाच चेंडूला छेडायला गेला अन्... 

शिखर धवन ( Shikhar Dhawan) व शुबमन गिल यांना ११ षटकांत ४८ धावा करता आल्या. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. रोमारिओ शेफर्डने ११व्या षटकात शॉर्ट बॉलवर धवनला जखमी करण्याचा प्रयत्न केला. शेफर्डने टाकलेला चेंडू धवनच्या हेल्मेटवर इतक्या जोरात आदळला की हेल्मेटमधील गार्ड बाहेर आलं. त्यानंतर पुढील चेंडूवर पुन्हा एक शॉर्ट बॉल टाकला. त्यावर धवनने अपर कट मारला, परंतु डीप थर्ड मॅनला कायले मेयर्सने अफलातून झेल घेतला. धवनला ३१ चेंडूंत १३ धावांवर माघारी जावे लागले. 

अफलातून झेल घेणाऱ्या कायले मेयर्सने नंतर गोलंदाजीत कमाल केली. अचूक टप्पा असलेल्या चेंडूला गती देत त्याने भारतीय फलंदाजांना चाचपडण्यास भाग पाडले. १६व्या षटकात मेयर्सच्या गोलंदाजीवर स्कूप मारण्याचा गिलने प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या तळावर आदळला अन् हवेत झेपावला. मेयर्सने कोणतीच चूक न करता सहज झेल घेतला. गिल ४९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४३ धावांवर विचित्र प्रकारे बाद झाला.  त्यानंतर पुढील षटकात मेयर्सने टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव ( ९) यालाही बाद केले. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर केलेली छेडछाड यादवला महागात पडली अन् त्याचा त्रिफळा उडाला. भारताने ७९ धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या. 

दरम्यान, टीम इंडियाने हा सामना २ विकेट्स राखून जिंकताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. शुबमन गिल ( ४३), संजू सॅमसन ( ५४), श्रेयस अय्यर ( ६३) व दीपक हुडा ( ३३) यांनी दमदार खेळ केला. अक्षर पटेलच्या झंझावातासमोर विंडीजचा पालापाचोळा झाला. अक्षरने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६४ धावा करताना भारताला २ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, १००वा वन डे सामना खेळणाऱ्या शे होपने ( Shai Hope) आज भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.  त्याने कायले मेयर्स ( ३९) सह ६५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर होपने शामार्ह ब्रुक्स ( ३५)सह ६२ धावांची आणि कर्णधार निकोलस पूरनसह ११७ धावा जोडल्या. पूरन ७७ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर त्रिफळाचीत झाला. होपने त्यानंतर खणखणीत षटकार खेचून शतक पूर्ण केले. १००व्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा होप हा जगातील दहावा आणि विंडीजचा चौथा फलंदाज ठरला. होप १३५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ११५ धावांवर शार्दूलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विंडीजने ६ बाद ३११ धावा केल्या. शार्दूलने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशुभमन गिलसूर्यकुमार अशोक यादव
Open in App