Join us  

IND vs WI, 2nd ODI Live Updates : Suryakumar Yadavने इतिहास रचला; सलग सहा वन डेत 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज बनला

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात निराशाजनक सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 4:49 PM

Open in App

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात निराशाजनक सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव सावरला. लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना वेस्ट इंडिजला सडेतोड उत्तर दिले. सूर्यकुमारने आजच्या सामन्यात मोठा पराक्रम करताना असा विक्रम नोंदवणारा जगातील पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. 

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्यात कर्णधार रोहित शर्माने मोठा डाव टाकला. लोकेश राहुलचे पुनरागमन होऊनही रोहितने सलामीला रिषभ पंतला उतरवले.  केमार रोचचा बाऊन्सरचा अंदाज घेण्यात रोहित चुकला अन् अवघ्या ५ धावा करून तो माघारी परतला. रिषभ व विराट कोहली यांनी सावध खेळ करताना भारताच्या डावाला आकार दिला. पण सलामीला खेळण्याची संधी मिळालेला रिषभ पंत अपयशी ठरला आणि अवघ्या १८ धावा करून तो माघारी परतला. १२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभने उत्तुंग फटका मारला, परंतु जेसन होल्डरने धाव घेत सुरेख झेल टिपला. त्यानंतर  ओडी स्मिथने पुढील चार चेंडू  वेगवेगळ्या प्रकारे फेकले आणि सहाव्या चेंडूवर विराटची विकेट घेतली. विराट ३० चेंडूंत ३ चौकारांसह १८ धावांवर बाद झाला.  भारताच्या १२ षटकांत ३ बाद ४३ धावा झाल्या आहेत.  

त्यानंतर लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी सावध खेळ करताना चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लोकेशला एक जीवदान मिळाले. ही जोडी चांगली जमलीय असे वाटत असताना लोकेशने घाई केली. अर्धशतकासाठी दोन धावांची गरज असताना तो दुसऱ्या धावेसाठी धावला अन् रन आऊट झाला. त्याने ४८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४९ धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये ४९ धावांवर धावबाद होणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. याआधी रवी शास्त्री, दिनेश मोंगिया, मोहम्मद कैफ, राहुल द्रविड हे ४९ धावांवर रन आऊट झाले होते. 

सूर्यकुमारने नंतर चांगली फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. पण, ३९व्या षटकात फॅबियन अॅलेनच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. सूर्यकुमारने ८३ चेंडूंत ५ चौकारांसह ६४ धावा केल्या. 

सूर्यकुमारचा विक्रमसूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील पहिल्या सहा डावांमध्ये ३०+ धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने आतापर्तंत पाच डावांत ३१*, ५३, ४०, ३९, ३४* व ६४ अशी कामगिरी केली आहे.  वन डे क्रिकेट इतिहासात पहिल्या सहा डावांमध्ये ३०+ धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज बनला आहे. याआधी इंग्लंडचा जो रूट, पाकिस्तानचा फाखर जमान, नेदरलँड्सचा रियान डॅस कँटे व ऑस्ट्रेलियाच्या टॉम कूपर यांनी पहिल्या पाच डावांमध्ये अशी कामगिरी केली होती. सूर्यकुमारने माजी सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धूचा विक्रम मोडला. सिद्धूने सलग ४ डावांमध्ये ३०+ धावा केल्या होत्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसूर्यकुमार अशोक यादव
Open in App