IND vs WI 2nd ODI, Rishabh Pant Rohit Sharma: टीम इंडियाने नवा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरूद्ध वन डे मालिकेतील दुसरा सामना जिंकला. पूर्णवेळ वन डे कर्णधार झाल्यानंतर पहिल्याच मालिकेत रोहितच्या टीम इंडियाने अजिंक्य आघाडी घेतली. वेस्ट इंडिजच्या संघाचा डाव २००च्या आतच आटोपला. पण भारतीय फलंदाजांनाही लौकिलाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताने ५० षटकात ९ बाद २३७ धावा केल्या. सूर्यकुमारच्या ६४ आणि राहुलच्या ४९ धावांच्या जोरावर कशीबशी भारताने २००पार मजल मारली. पण या सामन्यात चर्चा रंगली ती ऋषभ पंतच्या सलामीला फलंदाजी करण्याची... पंतला सलामीला उतरवण्यामागचा नक्की काय विचार होता, याबद्दल सामन्यानंतर रोहितने सांगितलं.
"काहीतरी वेगळा प्रयोग करण्याबाबत आमची संघ व्यवस्थापनासोबत चर्चा झाली होती. त्याचाच भाग म्हणून आज ऋषभ पंतला सलामीला फलंदाजी करण्यास पाठवण्यात आले. हा प्रयोग कायमस्वरूपी नाही. आज आम्हाला काहीतरी वेगळं करून पाहायचं होतं म्हणून तो प्रयोग करण्यात आला. पुढच्या सामन्यात आम्हाला आमचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन पुन्हा संघात मिळणारच आहे. धवनला तयारीसाठी बराच वेळ मिळाला आहे. त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास आहे. पण आम्हाला सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करायचे आहेत. आम्ही एखाद-दुसरा सामना हरलो तरी हरकत नाही, पण आम्ही संघात विविध प्रयोग करतच राहू", असं रोहितने सामन्यानंतर बोलताना स्पष्ट केलं.
"तिसऱ्या सामन्याआधी मध्ये एक दिवसाचा अवधी आहे. आम्ही या एका दिवसात अंदाज घेऊ की कोणता खेळाडू चांगल्या लयीत आहे आणि कोणाला संधी देणं गरजेचं आहे. पण काही खेळाडू असेही आहेत जे दीर्घकाळापासून संघासोबत आहेत, अशांना संघात स्थान मिळणं जास्त गरजेचं आहे", असं रोहित म्हणाला.
"मालिका जिंकणं ही नक्कीच आनंदाची बाब आहे. आम्ही जेव्हा फलंदाजीस उतरलो तेव्हा सामन्यात आव्हानात्मक परिस्थिती होती. सूर्यकुमार आणि लोकेश राहुल यांच्यातील भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची ठरली. आमच्या वरच्या फळीतील लोक जेव्हा झटपट बाद होतात तेव्हा मधल्या फळीतील फलंदाजांकडून ज्या अपेक्षा असतात त्याप्रमाणेच फलंदाजी झाली. जेव्हा तुमचे अनुभवी फलंदाजी चांगली कामगिरी करतात तेव्हा तुम्हाला त्याचा निकाल योग्यच मिळतो", असं रोहितने जाता जाता नमूद केलं.