नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. दरम्यान आज मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार असून या सामन्यात देखील विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्यासाठी धवन सेना मैदानात उतरेल. शिखर धवनच्या नेतृत्वात संघाने पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला होता. लक्षणीय बाब म्हणजे २००६ पासून भारतीय संघाने वेस्टइंडिविरूद्ध एकही मालिका गमावली नाही.
धवन-गिल शानदार फॉर्ममध्ये
पहिल्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी शतकीय भागीदारी नोंदवून शानदार सुरूवात केली होती. धवन केवळ ३ धावांनी आपल्या शतकाला मुकला तर गिल ६४ धावांची अर्धशतकीय खेळी करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने देखील ५४ धावांची खेळी करून लयमध्ये असल्याचे संकेत दिले आहेत.
अक्षर पटेल दुखापतीमुळे ग्रस्त
एकदिवसीय मालिकेपूर्वी रविंद्र जडेजाच्या रूपात भारतीय संघाला मोठा झटका बसला कारण त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले होते. जडेजाच्या दुखापतीमुळे ऑलराउंडर अक्षर पटेलला संघात स्थान मिळाले, मात्र त्याला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आपल्या जाळ्यात फसवण्यात अपयश आले होते. एवढेच नाही तर हाताच्या दुखापतीमुळे अक्षर पटेलला मैदानातून बाहेर देखील जावे लागले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळणार का नाही याबाबत संभ्रम आहे.
अर्शदीप सिंगचा होणार डेब्यू?
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला शुक्रवारच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मात्र रविवारच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मोहम्मद सिराजने मागील सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. मात्र प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांची चांगलीच धुलाई झाली होती. याशिवाय अक्षर पटेलच्या दुखापतीने तोंड वर काढले आहे त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी मिळू शकते.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
Web Title: IND vs WI 2nd ODI Today is the second match of the ODI series and Arshdeep Singh is likely to make his debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.