अहमदाबाद - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत या सलामीवीरांपाठोपाठ माजी कर्णधार विराट कोहलीसुद्धा फार काही कमाल दाखवू शकला नाही. विराट अवघ्या १८ धावा काढून बाद झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झगडत असलेला विराट कोहली बाद झाल्यानंतर आपली निराशा लपवू शकला नाही. पहिल्या सामन्यात स्वस्तात माघारी परतल्यानंतर आजही तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे बाद होऊन तंबूत परतताना विराटने स्वत:वरच राग व्यक्त केला.
आज भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असताना रोहित शर्मा आणि रिषभ पंत बाद झाले तेव्हा विराट कोहलीकडून एका मोठ्या खेळीसह संघाचा डाव सावरण्याची अपेक्षा होती. त्याने खेळपट्टीवर काही काळ घालवला. मात्र ओडिएन स्मिथच्या गोलंदाजीवर एक चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि विराटची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर विराट कोहली माघारी परतत असताना खूप वैतागलेला दिसला. तसेच तो मोठ्याने ओरडला. विराटने एकूण ३० चेंडूमध्ये १८ धावा काढल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार ठोकले.
दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यातील विराट कोहलीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजीचा प्रयत् केला होता. त्यानंतर तो चौथ्या चेंडूवर बाद झाला होता.