कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनौमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताने पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एक मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे.
पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहितला साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु आजच्या सामन्यात तो संपूर्ण कसर भरून काढण्यासाठी उत्सुक आहे. या सामन्यात 11 धावा करताच तो विक्रमाच्या शिखरावर विराजमान होणार आहे. ट्वेंटी-20 सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 62 सामन्यांत 2102 धावा केल्या आहेत, परंतु या विक्रमाला रोहितकडून धोका आहे.
लखनौच्या सामन्यात रोहितला अव्वल स्थानावर विराजमान होण्यासाठी केवळ 11 धावांची गरज आहे. रोहितच्या नावावर 85 सामन्यांत 2092 धावा आहेत. याशिवाय रोहितने आजच्या लढतीत 50 हून अधिक धावा केल्यास तो ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेईल. या क्रमवारीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील ( 2271), पाकिस्तानचा शोएब मलिक ( 2190) आणि न्यूझीलंडचा ब्रँडन मॅकलम ( 2140) हे अव्वल तीन स्थानावर आहेत.