कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज दुसरा ट्वेन्टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. या तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला माजी कर्णधार महेंदसिंग धोनीचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे.
भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून धोनीला वगळण्यात आले. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी निवड समितीला चांगलेच धारेवर धरले होते. पण ट्वेन्टी-20 संघात युवा रिषभ पंतला संधी देण्यासाठी धोनीला संघातून वगळण्यात आले, असे निवड समितीने सांगितले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात कार्तिक यष्टीरक्षण करताना दिसला आणि पुन्हा एकदा वाद सुरु झाला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कार्तिकने तीन झेल पकडले होते. यावेळी त्याने सर्वाधिक झेल पकडण्याच्या विक्रमांच्या यादीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराला (142) पिछाडीवर सोडले होते. आता कार्तिकच्या नावावर 143 झेल झाले आहेत. सध्याच्या घडीला सर्वाधिक विक्रमांच्या यादीत धोनी अव्वल स्थानावर आहे. धोनीच्या नावावर सध्या 151 झेल आहेत. त्यामुळे कार्तिकने जर नऊ झेल टिपले तर तो धोनीला पिछाडीवर टाकून अव्वल क्रमांक पटकावू शकतो.