India vs West Indies 2nd T20I Live Marathi : २ धावा २ विकेटनंतर वेस्ट इंडिजने निकोलस पूरन व रोव्हमन पॉवेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चांगले कमबॅक केले होते, परंतु नशिबाचे चक्र फिरले. पूरनची विकेट पडली अन् भारतीय गोलंदाजाने पुढील ३ धावांत ४ विकेट्स घेत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर फेकले. तरीही हातातून निसटलेला सामना विंडीजने खेचून आणला आणि २ विकेट्स राखून मॅच जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर हार्दिकने फलंदाजांवर खापर फोडले...
शुबमन गिल ( ९), सूर्यकुमार यादव ( १) आणि संजू सॅमसन ( ७) यांनी आज पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. इशान २३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २७ धावांवर बाद झाला. तिलकसह त्याने ४२ धावांची भागीदारी केली. तिलकने ३९ चेंडूंत पहिले अर्धशतक पूर्ण केले. तिलकला ५१ धावांवर ( ४१ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) झेलबाद केले. हार्दिकसह त्याने २७ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. हार्दिक ( २४ ) आणि अक्षर पटेल ( १४) यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रवी बिश्नोई ( ८) व अर्शदीप सिंग ( ६) यांनी संघाला ७ बाद १५२ धावांपर्यंत पोहोचवले.
हार्दिक पांड्याने भारताला चांगली सुरूवात करून देताना पहिल्या षटकात २ विकेट्स घेतल्या. निकोलस पूरन व रोव्हमन पॉवेल यांनी डाव सावरला आणि ३७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. पूरन ४० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढील ३ धावांत त्यांचे ४ फलंदाज बाद झाले. युझवेंद्र चहलने हेटमायरला ( २२) LBW केले. २४ चेंडू २४ धावा विंडीजला हव्या असताना अकिल होसेन ( १६*) व अल्झारी जोसेफ ( १०*) यांनी किल्ला लढवला अन् १८.५ षटकांत सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून द्विदेशीय मालिकेत सलग २ सामने गमावणारा हार्दिक पांड्या भारताचा पहिला कर्णधार ठरला. २०१६नंतर विंडीजने प्रथमच सलग दोन ट्वेंटी-२०त भारताला पराभूत केले.